छत्रपती संभाजीनगर : पावसाच्या मोठय़ा खंडामुळे खरीप पिके वाया गेली खरी, पण रब्बी हंगामात अवकाळी पावसामुळे झालेल्या लागवडीमुळे अनेक भागांत दिसणाऱ्या हिरवळीत दुष्काळ दाखवायचा कसा, असा पेच प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे आकडयांच्या आधारे आणि शेतकऱ्यांशी चर्चा करूनच केंद्रीय पथकापुढे परिस्थितीची मांडणी करावी लागणार असल्याने पथकाला कोणत्या गावात न्यायचे, याबाबत मंगळवारी खल सुरू होता.

हेही वाचा >>> शिंदे समितीचा अहवाल १५ डिसेंबपर्यंत; हैदराबाद दौरा निष्फळ; राज्यभरात २८ हजार कुणबी नोंदी आढळल्या

मराठवाडय़ातील आठ जिल्ह्यांतील पावसाची सरासरी ८३.७२ टक्के आहे. त्यात नांदेड जिल्ह्यात १०८ टक्के, तर हिंगोली जिल्ह्यात सरासरीच्या ९३ टक्के पावसाची नोंद झाली. मात्र, मराठवाडय़ातील अन्य सहा जिल्ह्यांतील पावसाची सरासरी कमालीची घसरलेली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पेरणी उशिरा झाल्याने आणि पावसाच्या खंडामुळे सोयाबीनची उत्पादकता ५० टक्क्यांनी घटली. उत्पादकता निम्म्याहून खाली आल्याची आकडेवारी कृषी विभागाकडून केंद्रीय पथकासमोर मांडण्यात येणार आहे. या आकडयांना मिळती-जुळती परिस्थिती कोठे आहे का, याचा शोध मंगळवारी दिवसभर सुरू होता. खरिपातील दुष्काळी स्थितीमध्ये रब्बीमध्ये कमालीचे बदल झाले. पथकातील अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांशी चर्चा करूनच दुष्काळातील नुकसानीची वस्तुस्थिती समजू शकते, असा दावा केला जात आहे.

केंद्रीय पथक आजपासून शेतकऱ्यांच्या बांधावर

पुणे : खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थितीमुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी आज, बुधवारपासून केंद्रीय पथक करणार आहे. त्यानंतर शुक्रवारी पुण्यात पथकाची बैठक होऊन केंद्राला नुकसान भरपाईचा अहवाल पाठविण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी केंद्राकडून राज्याला मदत देण्यात येणार आहे.