नांदेड : शासनानुदानित शिक्षण संस्थांमध्ये शिक्षक-प्राध्यापक आणि इतर पदांच्या भरतीत मोठ्या आर्थिक उलाढाली होतात. अशा असंख्य तक्रारींच्या पार्श्वभूमीवर भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी, आम्ही आमच्या संस्थेत चहा पाजून गुणवत्तेच्या निकषावरच शिक्षक-प्राध्यापकांची निवड करतो, असे येथे एका कार्यक्रमात स्पष्ट केले.
नांदेड महानगरातील भाजपच्या जंगमवाडी मंडळातर्फे विविध परीक्षांतील गुणवंतांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. खासदार चव्हाण अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर माजी आमदार अमरनाथ राजूरकर, भाजपचे विभागीय संघटनमंत्री संजय कौडगे, प्रवीण साले, शिवा कांबळे, किशोर स्वामी, विजय येवनकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
प्रदीर्घ परंपरा असलेल्या श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे अध्यक्षपद खासदार चव्हाण यांच्याकडे आहे. काही महिन्यांपूर्वी या संस्थेच्या वरिष्ठ महाविद्यालयात अनेक रिक्त पदे भरण्यात आली. इतर कोणत्याही संस्थांचा उल्लेख न करता, आमच्या संस्थेत शिक्षक-प्राध्यापकांची निवड करताना कोणताही देणगी घेतली जात नाही, असा दावा त्यांनी भाषणात केला. प्रत्येक विद्यार्थ्याला शिकण्याची संधी मिळायला हवी, आर्थिक अडचणींमुळे कोणाचेही शिक्षण थांबता कामा नये, यासाठी राजकीय नेत्यांनी पुढे यायला हवे, अशी अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी केवळ डॉक्टर, अभियंता बनण्यावर समाधान न मानता स्पर्धात्मक परीक्षांकडे वळून स्वतःला घडवावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
वरील कार्यक्रमात दहावी, बारावी, नीट, जेईई आदी परीक्षांतील यशस्वी दहा विद्यार्थ्यांना विशेष सन्मानचिन्ह देऊन, तर दीडशेहून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांना वह्या आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी शिवा कांबळे, अमरनाथ राजूरकर, प्रवीण साले आदींचे भाषण झाले. कार्यक्रमास गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
आमची मुले यूपीएससी-एमपीएससी व्हावीत. त्यांनी राजकारणात प्रवेश केला, तर मला आनंदच वाटेल. राजकारणातला सहकारी शिकलेला असेल, तर चांगली भावना निर्माण होईल. – खासदार अशोक चव्हाण.