छत्रपती संभाजीनगर : लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील बेळसांगवी गावाला पाण्याचा वेढा पडला असून गावकऱ्याचे तातडीने स्थलांतर करावे लागाणार आहे. आमदार संजय बनसोडे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी फोनवर चर्चा केली असून गावातील ७०० ते ८०० लोकांना सुरक्षित स्थळी आणण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.

तिरुनदीच्या प्रकल्पामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यात अधिक पाऊस झाला तर परिस्थिती हाताबाहेर जाईल असे सांगण्यात आले. स्थानिक अग्निशमन विभागाचे दोन चमू घटनास्थळी दाखल स्थलांतराची मोहीम सुरू केली आहे. मात्र परिस्थिती गंभीर होत असल्याने आणखी मनुष्यबळ लागेल असे सांगण्यात आले.

उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री शिवेंद्र राजे भोसले यांच्याशी फोनवर चर्चा केली. राष्ट्रीय आपत्ती पथकाचे जवान व लष्करालाही पाठवावे अशी विनंती करण्यात आली आहे. गावातील परिस्थितीची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आली आहे.