छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ते फुलंब्री महामार्गावरील दुभाजकाला मोटार धडकून झालेल्या अपघातात तीन तरुण ठार झाले. तर दोघे जखमी झाले. मृतांमध्ये दोन सख्ख्या चुलत भावंडांचा समावेश आहे. मतपाटी पुलाच्या परिसरात मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास हा अपघात घडला.

सय्यद माजीद (वय १८, रोशन गेट), रियान जमील शेख (वय १६) व अराफत असिफ शेख (वय १७, दोघेही रा. पिंप्री राजा) अशी मृत तरुणांची नावे आहेत. तर उजेर फिरोज खान, शरीफ शेख अशी जखमींची नावे असून, दोघांवरही छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रियान व अराफत हे दोघे चुलत भाऊ असल्याची माहिती मिळाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार पाचही तरुण छत्रपती संभाजीनगर शहरातून फुलंब्री शहराच्या परिसरात जेवणासाठी एका खासगी हॉटेलवर गेले होते. रात्री दहा वाजेच्या सुमारास जेवण झाल्यानंतर ते प्रवास करत असलेल्या कारने छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने येत होते. फुलंब्रीहून आठ ते दहा किलोमीटर अंतरावरील मतपाटी पुलाच्या परिसरात पादचाऱ्यांना तयार केलेल्या डाव्या बाजूच्या दुभाजकाला तरुणांची भरधाव कार धडकली. अपघात एवढा भीषण होता की, कार पूर्णपणे चक्काचूर झाली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर महात्मा फुले रुग्णवाहिका चालक विजय देवमाळी यांनी घटनास्थळी येऊन फुलंब्री पोलिसांच्या मदतीने कारमधील तरुणांना उपचारासाठी फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी तपासून सय्यद माजीद, रियान शेख, अफरात शेख या तिघांना मृत घोषित केले.