Missing Women Murder News – वनविभागाच्या जमिनीपासून गेलेल्या लोहगड नांद्रा मार्गावरील अंजनडोह शिवारात एक अनोळखी मृतदेह ३१ ऑक्टोबरच्या दुपारी आढळला. त्याची माहिती छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसाच्या करमाड ठाण्याला कळवण्यात आली.

घटनास्थळी जाऊन उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नांगरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत व स्थानिक पोलिसांनी पाहणी केली असता एक स्त्री जातीचा मृतदेह आढळून आला. अधिक तपास केला असता गळा रक्ताळलेला होता. पोलिसांना संबंधित महिलेचा गळा कापून निर्घृण खून केल्याचा अंदाज आला. परंतु प्रथम मृतदेहाची ओळख पटवणे महत्त्वाचे होते. त्या दिशेने माहिती घेण्यास सुरुवात केली. कोणी एखादी महिला मिसिंग आहे का त्याची वेगवेगळ्या ठाण्यांकडून माहिती घेण्यास सुरुवात केली.

अखेर शहर पोलीस आयुक्तालयातील बेगमपुरा पोलीस ठाण्यात एक महिला हरवल्याची तक्रार ३० ऑक्टोबरला दाखल झाल्याची नोंद आहे, अशी माहिती पुढे आली. त्या महिलेचे नाव कांताबाई अनिल सोमदे (वय ५१, रा. आडगाव सरक ता.जि.छत्रपती संभाजीनगर) असे नाव पुढे आले. बेगमपुरा ठाण्यात तक्रार कांताबाईचे पती अनिल सोमदे (वय ५५) यांनी संबंधित तक्रार नोंदवली होती.

तक्रारीनुसार कांताबाई सोमदे ३० ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घाटी दवाखाना येथे उपचारकामी जात आहे असे सांगुन घरुन गेल्या होत्या. सकाळी साडेअकरा वाजेच्या दरम्यान त्यांचे पती अनिल यांनी फोन करुन कोठे आहे असे विचारले असता त्यांनी, कांताबाईंनी घाटी दवाखाना येथे नंबरला उभी आहे, असे सांगितले. पण संध्याकाळ झाली तरी त्या परतल्या नाहीत. कांताबाई घरी न आल्याने तसेच फोन न लागल्याने त्यांचा घाटी दवाखाना व ईतर ठिकाणी शोध घेतला. पण त्या मिळुन न आल्याने बेपत्ता झाल्याबाबतची तक्रार बेगमपुरा ठाण्यात ३१ ऑक्टोबरला दाखल करण्यात आली होती. त्याच दिवशी दुपारी कांताबाईंचा मृतदेह अंजनडोह शिवारात मिळुन आल्याने पोलीस ठाणे करमाड येथे फिर्यादी अनिल एकनाथ सोमदे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्हयाचे अनुषंगाने सहायक पोलीस निरीक्षक पवन इंगळे, हवालदार सुनील गोरे, वाल्मिक निकम, शिवानंद बनगे, महेश बिरुटे, अनिल काळे, चालक संजय तांदळे यांचे पथकाने काही तासात गुन्हा उघडकीस आणला. हा गुन्हा मारुती नामदेव भुईगळ (वय ५०, रा.धानोरा ता. फुलंब्री) याने केला असल्याची माहिती मिळाल्याने त्याचा शोध घेतला.

मारुती भुईगळ हा छत्रपती संभाजीनगर येथे मिळुन आला. त्यास ताब्यात घेवुन गुन्हयाबाबत विचारपुस केली असता तो व मृत महिला एकमेकाचे ओळखीचे होते. त्यांच्यात झालेल्या वैयक्तीक वादातुन त्याने कांताबाईचा खून केल्याची कबुली दिली. तपास पथक आणि तांत्रिक विश्लेषन शाखेच्या अंमलदारांनी गुन्हा उघडकीस आणला.