छत्रपती संभाजीनगर : कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी आपले स्वागत पुष्पगुच्छांऐवजी पुस्तक देऊन करावे, अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या असतानाही त्यांचे बीड दौऱ्यात क्रेनला पुष्पहार लावून स्वागत झाले. परळीत चार ठिकाणी क्रेन हारांनी स्वागत करण्यात आले. काही पदाधिकाऱ्यांनीही फुलांचा गुच्छ दिला. पोलीस अधीक्षक नवनीत काॅवत यांनी मात्र रोप देऊन स्वागत केले.

बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनिमित्त आयोजित अजित पवार यांच्या दौऱ्याचा प्रारंभ परळीतूनच झाला. लातूरला विमानाने आलेले पवार तेथून हेलिकाॅप्टरने परळीत पोहोचले. परळीत त्यांचे आगमन होताच आझाद चौक, वैद्यनाथ मंदिर, राणी लक्ष्मीबाई टाॅवर व संभाजी चौक-ईटके काॅर्नर येथे क्रेनचा हार घालण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

अलीकडेच नांदेडच्या दौऱ्यात फुलांचा गुच्छ घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांना अजित पवार यांनी फटकारले होते. परळीत मात्र, क्रेनच्या हारांनी केलेले स्वागत त्यांनी स्वीकारले. परळीत पोहोचल्यावर अजित पवार यांनी वैद्यनाथ मंदिराला भेट देऊन पिंडीवर दुग्धाभिषेक केला. मंदिर देवल कमिटीकडून राजेश देशमुख यांनी पवार यांच्यासह मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे यांचाही सत्कार केला.

त्यानंतर पवार यांनी तीर्थक्षेत्र विकास योजनेतून करण्यात येत असलेल्या बांधकामाची पाहणी केली. वैद्यनाथ परिसराच्या विकासासाठी सुरुवातीला १३३ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर झालेला आहे. त्यानंतर २०२१ साली हाच आराखडा सुधारित करून तो २८६ कोटींचा तयार करण्यात आला होता. तोही मंजूर झालेला आहे. मात्र, कामाने अपेक्षित गती घेतलेली नाही. त्यामुळे अजित पवार यांनी मंदिराच्या पायऱ्यांच्या कामाची स्वत: चालत येऊन प्रत्यक्ष पाहणी केली. कामातील त्रुटी हेरून सर्वांसमक्षच कंत्राटदाराची कानउघाडणीही केली. या वेळी पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, परळीचे आमदार धनंजय मुंडे, आमदार विक्रम काळे, माजी आमदार संजय दौंड आदींची उपस्थिती होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विश्रामगृहाबाहेर जोरदार घोषणाबाजी

परळीत अजित पवार शासकीय विश्रामगृहात असताना बाहेर मराठा कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू होती. न्याय द्या, न्याय द्या; एक मराठा, लाख मराठा; बीड जिल्ह्यातील, परळीतील गुंडाराज बंद झाले पाहिजे; शिवराज दिवटेला न्याय द्या, अशा घोषणा सुरू होत्या. आंदोलकांची पवार यांनी बाहेर येऊन भेटही घेतली. जिल्हाधिकारी जाॅन्सनही या वेळी उपस्थित होते.