छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे व महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी बीड येथे घेण्यात आलेल्या मेळाव्यावर धनंजय मुंडे यांचाच वरचष्मा असल्याचे चित्र दिसून आले. या मेळाव्याकडे पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मात्र पाठ फिरवली होती. आमदार सोळंके हे काही वैयक्तिक कारणांमुळे उपस्थित राहू शकले नाहीत, असे स्पष्टीकरण मेळाव्यातच देण्यात आले असले तरी त्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
खासदार तटकरे मागील चार दिवसांपासून मराठवाडा दौऱ्यावर होते. परभणीच्या दौऱ्यातही त्यांच्यासोबत धनंजय मुंडे दिसून आले. बीडमधील मेळाव्यात धनंजय मुंडे हे सुनील तटकरे यांच्या बाजूलाच उभे होते आणि ते समर्थक कार्यकर्त्यांचा आवर्जून परिचयही करून देत होते. यावेळी पक्षाच्या बीड जिल्हा कार्यकारिणीत निवडलेल्या पदाधिकाऱ्यांना प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
त्यातील बहुतांश पदाधिकारी हे धनंजय मुंडे यांचे समर्थकच मानले जातात. त्यामध्ये युवक जिल्हाध्यक्ष बळीराम गवते, बीडचे अमर नायकवाडी, परळीचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, विधानसभा अध्यक्ष बालासाहेब शेप आदींचा समावेश आहे.
प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत नियोजित आणि मागील आठवड्यात निश्चित झालेल्या या मेळाव्याकडे पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रकाश सोळंके यांनी पाठ फिरवली. सोळंके यांनी त्यांच्या वैयक्तिक कार्यक्रमामुळे मेळाव्याला हजर राहू शकत नाही, असे कळवल्याचे सांगण्यात आले. प्रकाश सोळंके आणि धनंजय मुंडे यांच्यातील ‘सख्य’ सर्वश्रुत आहे. महाविकास आघाडीच्या काळात धनंजय मुंडे यांना मंत्रिपद दिल्यामुळे आणि सोळंके यांना मंत्रिपदापासून दूर ठेवल्यावरून बरेच नाराजी नाट्य घडले होते.
प्रकाश सोळंके यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. आत्ताही परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणातही धनंजय मुंडे यांची विरोधकांकडून कोंडी केली जात असताना प्रकाश सोळंके यांनी विधानसभेत प्रश्न विचारला होता. त्यामुळे सोळंके यांची मेळाव्याकडे पाठ फिरवणे हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
या मेळाव्यात गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित, क्षीरसागर घराण्यातील डाॅ. योगेश क्षीरसागर, रमेश आडसकर आदी नेतेही धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीयच मानले जातात. यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यावर धनंजय मुंडे यांचाच वरचष्मा दिसून आल्याचे स्पष्ट झाले.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही धनंजय मुंडेंना जवळचे स्थान देण्यात आलेले होते. मुंडे यांचे पक्षासाठीचे योगदान लक्षणीय आहे. त्यांच्याकडे गुणवत्ता, संघटन कौशल्य असून, त्यांचे पक्षातील स्थान अबाधित असल्याचेही यावेळी बोलताना तटकरे यांनी आवर्जून सांगितले.