छत्रपती संभाजीनगर : शंभरीच्या उंबरठ्यावर असलेल्या सासूच्या निधनाचे वृत्त समजताच सुनेचाही हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना येथील वेदांतनगर भागात मंगळवारी दुपारी घडली. मृत दोघीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी सुरक्षा अधिकारी सुरेश रुपचंद परदेशी यांच्या पत्नी व आई होत.
सुरेश परदेशी हे वेदांतनगर भागात आई, पत्नी व मुलाबाळांसह सध्या राहतात. दीपावलीच्या सुटीनिमित्त त्यांच्या आई नाशिकला भावाकडे गेलेल्या होत्या. मंगळवारी ते घरी बसलेले असताना आई रुक्मिणी रूपचंद परदेशी (वय ९६) यांचे निधन झाल्याची बातमी दुपारी एक वाजेच्या सुमारास भावाकडून मिळाली. यानंतर नाशिकला तातडीने निघण्याच्या तयारीत कुटुंबीय होते.
याच दरम्यान सुरेश परदेशी यांच्या पत्नी विजया परदेशी (वय ६२) यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) दाखल करण्यात आले. परंतु, तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले होते. या दोघींमध्ये आई-मुलीप्रमाणे जिव्हाळ्याचे नाते होते आणि त्यातूनच सासूच्या निधनाचे वृत्त कळताच सुनेचाही धक्का बसून मृत्यू झाल्याचे परदेशी परिवाराच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, रुक्मिणीबाई यांच्यावर नाशिक येथे मंगळवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पाच मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. तर विजया परदेशी यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी ३ वाजता पुष्पनगरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विजया यांच्या पश्चात पती, दोन विवाहित मुली, एक मुलगा, नातवंडे असा परिवार आहे.
