छत्रपती संभाजीनगर : शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेल्या लातूर जिल्ह्यातील अहमदपूर मंगळवारी एका दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने हादरले. अहमदपूर तालुक्यातील रुद्धा गावातील पिता-पुत्राचा धारदार शस्त्राने मध्यरात्री खून करण्यात आला असून, हल्लेखोरांनी मृतदेह ग्रामपंचायतच्या पाण्याच्या टाकी परिसरात आणून फेकून दिल्याचे सकाळी समोर आल्यानंतर घटनेला वाचा फुटली. या प्रकाराने परिसर पुरता हादरून गेला आहे. मृत पिता-पुत्र हे त्यांच्या गावाजवळील शेतातील आखाड्यावर झोपलेले होते.

शिवराज निवृत्ती सुरनर (वय ७०) आणि विश्वनाथ शिवराज सुरनर (२०), अशी मृत पिता-पुत्राची नावे असून, अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या धारदार शस्त्राच्या हल्ल्यात दोघेही गतप्राण झाले. ३ नोव्हेंबरच्या मध्यरात्री घडलेली ही घटना ४ नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे.सुरनर पिता-पुत्र हे रोजच्याप्रमाणे संध्याकाळी साडेनऊच्या सुमारास शेतातील आखाड्यावर झोपायला गेले होते. मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या चेहऱ्यावर, तोंडावर आणि गळ्यावर धारदार शस्त्राने अनेक वार करत दोघांना ठार केले. नंतर आरोपींनी त्यांचे मृतदेह शेतातून उचलून ग्रामपंचायतच्या पाण्याच्या टाकीजवळ फेकून दिले. सकाळी ही घटना उघडकीस येताच गावात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले. रुद्धा गावात दोन जीव घेतलेल्या या दुहेरी हत्याकांडाने परिसर हादरला आहे. पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून, तपासाला वेग देण्यात आला आहे.

न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे व श्वान पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असून, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, उपविभागीय अधिकारी अरविंद रायबोले, पोलिस निरीक्षक विनोद मेत्रेवाड यांच्यासह मोठा पोलिस फौजफाटा रूद्धा गावात दाखल झाला होता. ठसे तज्ज्ञांच्या पथकाकडून काही ठिकाणी पाहणी केली असून, मोबाइल फोन तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. या सर्व पथकांकडून आपआपल्या कार्य पद्धतीनुसार पुरावे गोळा करण्यात आले. दरम्यान, मृत पिता-पुत्रांचे मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाइकांकडे सुपूर्द करण्यात आले असून, या प्रकरणी अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गावात पुन्हा भीतीचे सावट

विशेष म्हणजे, याच रूद्धा गावात वर्षभरापूर्वीही वृद्ध दाम्पत्यावर हल्ला होऊन एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. अशा घटना सलग घडत असल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली असून, खुन्यांचा लवकरात लवकर शोध घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.खुनाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. घटनास्थळी सर्व प्रकारचे पुरावे गोळा करण्याचे काम केले जात आहे. तपास वेगाने केला जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.