छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील कन्नड, वैजापूर तालुक्यातील काही भागांमध्ये सोमवारच्या मध्यरात्री ते मंगळवारी पहाटेच्या सुमारास झालेली अतिवृष्टी मोठ्या नुकसानीची ठरली. कन्नड तालुक्यातील पिशोर भागातील अंजना नदीला पूर आल्याने टाकळी खुर्द येथील साहेबराव नथ्थु दहिहंडे (वय ४५) हा शेतकरी वाहून गेला. त्यांचा शोध घेतला असता सिल्लोड हद्दीत ते सापडला. नाचनवेल प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता त्यांना मृत घोषित केले. तर कन्नड शहरातून एक ११ मुलगा वाहून गेल्याची माहिती आहे.

वैजापूर शहरातील पंचशीलनगरसह इतर अनेक वसाहतींमधील घराघरांमध्ये पाणी शिरल्याचे चित्र होते. कापूस वाडगाव, भग्गाव, वीरगाव, लाख खंडाळा येथे ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीला वैजापूर येथील कृषी मंडळ अधिकारी विशाल साळवे यांनी दुजोरा देताना सांगितले की, काही भागात मंगळवारी आम्ही पाहणी केली. त्यामध्ये नुकसानीचे चित्र दिसले.

वैजापूर तालुक्यात कांद्याचे मोठे क्षेत्र असून, मागील काही दिवसांपासून सततचा पाऊस आहे. सूर्य दर्शन अत्यंत कमी प्रमाणात आणि पाऊसच अधिक होत असल्याने अशा वातावरणात कांद्याला बुरशी चढते. रोपमाळांमध्ये (नर्सरी) मर रोग पसरतो. रोपमाळा व पंधरा दिवसांपूर्वीपासून सुरू असलेल्या नवीन लागवडीच्या कांद्याला अतिवृष्टीचा फटका बसला असून, मागील आठवड्यात वैजापूर, गंगापूर व पैठणमधील परिसरातील चाळीतील कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे.