छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात जोरदार पावसामुळे नदी, नाले बंधाऱ्यास मोठ्या प्रमाणात पाणी असून काही भागात नद्या धोक्याच्या पातळीपर्यंत पोहचल्या आहेत. धरणे पूर्णत: भरू लागले आहेत. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील कोटबाजार येथे भिंत पडून दोघांचा मृत्यू झाला. शेख नासेर आमीन व हसिना बेगम शेख अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. स्वातंत्री दिनी मराठवाड्यातील २२ महसूल मंडलात अतिवृष्टी नोंदिवण्यात आली. शनिवारी दुपारपर्यंत अनेक भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्याचे मराठवड्यातील वार्ताहर कळवितात.

जालना तालुक्यातील नागेवादी येथेही भिंत पडल्याचे वृत्त आहे. रात्रीतून भिंत पडल्याच्या घटनांबरोबर धरण पातळीत मोठी वाढ झाल्याने लातूर जिल्ह्यातील मांजरा, तावरजा नदी दुथडी भरुन वाहत असून माकणी, तेरणा धरण पूर्णत: भरले आहे. अनेक भगाात कमी उंचीच्या पुलावर पाणी जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही चौका ते लाडसावंगी या पट्टयात जोरदार पाऊस झाल्याचे वृत्त आहे. शेंद्रा औद्योगिक वसाहतीच्या या पट्टयात रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक जवळपास ठप्पच झाली आहे. जिल्ह्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. अनेक भागात पिकांच्या वाढीसाठी हा पाऊस गरजेचा होता, असे जिल्हा कृषी अधिकारी डॉ. प्रकाश देशमुख यांनी सांगितले.

लातूर जिल्ह्यात शनिवारी भीज पाऊस होता. मात्र, दुपारीनंतर अतिपाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाने दिला असल्याचे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे. लातूर,बीड व जालना येथेही पाऊस सुरू आहे. जालना शहर व जिल्ह्यात गेल्या दोन तासापासून पाऊस सुरू असल्याचे सांगण्यात आले.