छत्रपती संभाजीनगर : पैठणनगरीतील संत एकनाथ महाराजांच्या वंशांजामधील वाद सोमवारी मध्यरात्री नाथषष्ठी सोहळ्यानिमित्त काढण्यात आलेल्या छबिना मिरवणुकी दरम्यान उफाळून आला. नाथांच्या पादुका ठेवण्यावरून निर्माण झालेल्या वादामुळे छबिना मिरवणूक सुमारे चार तास रखडली. अखेर प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर पहाटे चार वाजता मिरवणूक पार पडली.

नाथांच्या १३ व्या वंशजांमधील पुढील पिढीतला हा वाद असल्याचे सांगितले जात आहे. पैठणमधील स्थानिक ज्येष्ठांकडून मिळालेल्या माहितीनुसार संत एकनाथांच्या दोन पादुका पैठणमध्ये आहेत. एक पादुका विजयी विठ्ठल असलेल्या मुख्य मंदिरात आहेत, दुसऱ्या पादुका या वंशजांमधील १३ व्या पिढीतील रंगनाथबुवा उपाख्य भैय्यासाहेब महाराज गोसावी यांच्या पुढच्या पिढीकडच्या घरातील देवघरात आहेत. घरातील पूजेतील या पादुका छबिना मिरवणुकीत ठेवून त्या नगरभर मिरवत आणल्या जातात. पूर्वापार चालत आलेली ही परंपरा असल्याचे सांगितले जाते. मात्र त्या पादुका ठेवण्यास वंशजांमधील एका गटाने विरोध केला. त्यावरून वाद उफाळून वर आला. अखेर पादुकांऐवजी नाथ महाराजांची प्रतिमा ठेवून छबिना मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये प्रशासनाची कसरत झाली.

हेही वाचा : …पुन्हा पारंपरिक लढतीची शक्यता, धाराशिव जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पैठणमध्ये तीन दिवसांपासून नाथषष्ठी सोहळ्याचा उत्सव पार पडत आहे. मंगळवारी काल्याच्या कोर्तनाने सोहळ्याची सांगता होत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नाथषष्ठी सोहळ्याची जिल्हाधिकारी घोषित सुटी असते. सोहळ्यासाठी राज्यभरातून ६५० वर लहान-मोठ्या दिंड्या दाखल झाल्या असून लाखो वारकरी, भाविक दाखल होत असल्याने प्रशासनाकडूनही सर्व चोख व्यवस्था करण्यात येते. यंदा नाथषष्ठी सोहळ्याच्या पूर्व संध्येला नाथ वंशजांनी त्यांच्यातील वाद मिटल्याचे पत्रकार बैठक जाहीर केले होते. पण एका गटाने. तर दुसऱ्या गटाने वाद मिटले नाहीत, असे पत्रक प्रसिद्ध करून स्पष्ट केले होते. वादाची ही धूसफूस सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास उफाळून आली. या पार्श्वभूमीवर “लोकसत्ता”ने दोन्ही गटातील वंशजांशी संपर्क साधला. मात्र दोन्ही गटाकडून कुठलाही प्रतिसाद मिळू शकला नाही.