नांदेड : दहावीत शिकणारा ओमकार संक्रांतीसाठी उदगीरहून गावी आला. सणाच्या निमित्ताने नवीन कपडे, नवीन फोनसह इतर शालेय साहित्यासाठी वडिलांकडे त्याने आग्रह धरला. “थांब जरा, जाऊ दे काही दिवस, मग घेऊन देतो” असे वडिलांनी सांगितले खरे, पण घरावरील कर्जाच्या डोंगराचा अंदाज असलेल्या ओमकारने परिस्थितीमुळे आपल्याला काही मिळणार नाही हे ओळखून शेतात जाऊन गळफास घेतला. मुलाच्या नाराजीचा अंदाज घेत पित्याने त्याला शोधत शेत गाठले तर तिथे ओमकार झाडाला लटकलेला. कर्जबाजारी परिस्थितीपुढे हतबल पित्याने फासावर लटकलेल्या मुलाला खाली उतरवले आणि त्याच दोरखंडाने स्वतः फासावर चढला. ही घटना बिलोली तालुक्यातील मिनकी येथे शुक्रवारी उघडकीस आली.

राजेंद्र लक्ष्मण पैलवार (वय ४३) व ओमकार राजेंद्र पैलवार (वय १६), अशी आत्महत्या केलेल्या पिता-पुत्राची नावे आहेत. राजेंद्र पैलवार यांना पत्नी व तीन मुले आहेत. पहिला मुलगा बारावी पास असून तो शेतीमध्ये काम करतो. दुसरा मुलगा ११ वीत आहे. तसेच आत्महत्या केलेला तिसरा मुलगा ओमकार हा लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे शंकर माध्यमिक विद्यालय आश्रम शाळा येथे १० वीच्या वर्गात शिक्षण घेत होता. राजेंद्र पैलवार यांच्या कुटुंबात दोन एकर जमीन आहे. त्या जमिनीवर साडे चार लाख रुपये महाराष्ट्र ग्रामीण बँक, खतगाव शाखेच्या कर्जासह काही खाजगीही कर्ज होते. शेतावर कर्ज व सततची नापीक होत असल्याने मुलांच्या शिक्षण खर्चाबाबत नेहमी घरात आर्थिक ताण पडायचा. त्यातच संक्रात सणानिमित्त दोन दिवसांपूर्वी उदगीर येथे शिकायला असलेली दोन्ही मुलं गावाकडे आले होते. त्यातील ओमकारने बुधवारी दुपारी वडिलांना नवीन कपडे, शालेय साहित्य व मोबाईल फोन घेऊन देण्याविषयी सांगितले.

हेही वाचा : २१०० कोटींचा तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखडा मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे सादर, आमदार पाटील यांची माहिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परंतु, वडिलांनी काही दिवस थांब, पैसे नाहीत. ते आले की घेऊन देतो, असे म्हटल्यावर ओमकार नाराज होऊन रात्रीच्या वेळेस शेताकडे गेला. तेथील झाडास गळफास घेत आत्महत्या केली. मुलगा घरी नसल्याचे पाहून वडिलांनी दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा शोध घेतला. शोधतच ते शेताकडे गेले असता तेथील झाडाला मुलगा गळफास घेऊन लटकत असल्याचे राजेंद्र यांनी पाहिले आणि त्याला खाली उतरवून त्याच दोरखंडाने स्वत: फास घेऊन आत्महत्या केली आहे.