छत्रपती संभाजीनगर : रात्री साडे सहा वाजता सूचना आली आता जायकवाडी धरणातून तीन लाख प्रतिसेंकद घनफूट वेगाने पाणी सोडावे लागणार आहे. जायकवाडी धरण परिसरातून पैठणमधील १४ गावातून संभाव्य पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलविण्याची तयारी दुपारपासून सुरू करण्यात आली होती. रात्री पैठणच्या नाथ मंदिरात पाणी वाढत गेले. गागाभट्ट चौक, जुनी बाजारपेठेत पाणी आले. गुडघाभर पाणी शहरात आले होते. जालना जिल्ह्यातील गोदावरी कोठावरील ३८ गावातून लोक जनावरांसह सुरक्षित स्थळी आणण्यात आले. पूर वाढत होता. घरादारात पाणी वाढत होते. बीड, परभणी, नांदेडपर्यंत ही कसरत रात्रभर सुरू होती.

मराठवाड्यातील पूरस्थिती सकाळी नियंत्रणात येऊ लागली आहे. जायकवाडी धरणातून होणारा विसर्ग आता तीन लाखाहून दोन लाखापर्यंत खाली आला आहे. पावसाने दिलेला तडाखा जमीन खरवडून नेत होता. सारे नुकसान डोक्यादेखत बघावे लागत होते.

जालना जिल्ह्यातून आठ हजार जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. या कामात माजी आमदार राजेश टोपे यांनी खास लक्ष घातले होते. रात्री उशिरापर्यंत ते नदीच्या काठाच्या गावातून माणसांना सुरक्षित स्थळी हलविण्यात मदत करत होते. संपूर्ण जिल्ह्यात ील उपनद्यांमध्येही पूर आल्याने जिल्हाभर प्रशासन जागे होते. बीड जिल्ह्यातील माजलगाव, गेवराई तालुक्यात आधीच लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते.

जायकवाडीतून तीन लाख प्रतिसेंकद वेगाने पाणी सोडल्यामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे पैठणमध्ये आठ हजार ७४ जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. पैठण शहरातून ३१६ कुटुंब, कावसान जुने, दादेगाव, नायगाव, वडवाली, चकनवाडी, आपेगाव, नावगाव, मायगाव, कुरणपिंप्री, हिरडपूरी, पाटेगाव, आवडेउंचगाव येथून १५७४ कुटुंबातील व्यक्तींना हलविण्यात आले आहे.

सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पैठणच्या नाथसागरातून विसर्ग कमी करण्यात आला. तो आता एक लाख ७५ हजारांपर्यंत खाली आला आहे. नदीची काठच्या अनेक गावात आता पूरस्थिती नियंत्रणात येऊ शकेल. शनिवारी दुपारनंतर बहुतांश भागातून पाऊस थांबला आहे. मात्र, सिंदफणा नदीच्या परिसरातील गावांमध्ये पूर परिस्थिती कायम आहे. या भागातील अनेक गावात पाणी पसरत आहे. पाऊस थांबल्याने आजपासून पंचनाम्याला वेग येईल असा दावा केला जात आहे. दरम्यान आपत्ती व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांचे गावोगावी कौतुक होते आहे. बीड जिल्ह्यात कोणी अडकलेले नाही, असा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला आहे.