छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यातील खंडाळा येथे दोन लहान मुलांवर रविवारी दुपारी एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दोन्ही मुलांसह त्यांचे आई-वडीलही घरात पसरलेल्या आगीमध्ये गंभीर जखमी झाले होते. यातील दोन्हीपैकी एकाचा शनिवारी सायंकाळी तर दुसऱ्याचा त्यानंतर मध्यरात्री दुसऱ्या मुलाचा छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) उपचारादरम्यान मृत्यू झाला.

तर याच रुग्णालयात उपचार घेणारऱ्या त्यांच्या आई-वडिलांना पोटचे दोन्ही गोळे आता या जगात नसल्याचे सांगण्यात आले नसून, मुलांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आल्याचे खोटेच सांगून धक्का बसणार नाही या काळजी नातेवाईक व ग्रामस्थांनी घेतली आहे. अविनाश उर्फ गोपाळ प्रकाश दळवे (वय १२) व आकाश प्रकाश दळवे (१५), असे मृत मुलांची नावे आहेत. तर प्रकाश मोहन दळवे (वय ४०) व सुरेखा दळवे, असे भाजून जखमी झालेल्या आई- वडिलांची नावे आहेत.

खंडाळा येथील दळवे कुटुंबात नवरात्राच्या तिसऱ्या माळेला (२४ सप्टेंबर) देवासमोरील दिव्या शेजारील बाटलीतील पेट्रोलचा भडका उडाल्याने घरात आग पसरली. या आगीत दळवे कुटुंबातील चौघेही भाजले गेले. या चौघांनाही उपचारासाठी घाटीमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना अविनाश व आकाशचा मृत्यू झाला. तर प्रकाश व सुरेखा दळवेंवर घाटीत उपचार सुरू आहेत, परंतु त्यांना धक्का बसू नये, यासाठी मुलांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली नाही. प्रकाश यांचे बंधू अर्जुन दळवे यांनी अविनाश व आकाश या आपल्या दोन पुतण्यांवर अंत्यसंस्काराचे सोपस्कार पार पाडले. यावेळी अवघे खंडाळा गाव शोकसागरात बुडाले.