छत्रपती संभाजीनगर – राज्य परिवहन महामंडळाच्या मराठवाड्यातील सात विभागांतून दिवाळी हंगामात ६५ कोटी ८५ लाख ३६ हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. यामध्ये लातूर विभागाने सर्वाधिक ११ कोटी ४५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. तर धाराशिव व नांदेड विभागाची कामगिरी सुमार राहिली आहे.
लातूर विभागाने गतवर्षीच्या दिवाळीत १० कोटी ८ लाख ४७ हजारांचे उत्पन्न मिळवले होते. यंदा १८ ते २७ ऑक्टोबर या दहा दिवसांत ११ कोटी ४५ लाखांचे उत्पन्न मिळवले. या दरम्यान लातूर विभागाने २० लाख ३९ हजार किलोमीटरचा प्रवास केला. तर दिवाळीत गतवर्षी १८ लाख ९२ हजार किमीचा प्रवास केला होता. छत्रपती संभाजीनगरने यंदाच्या दिवाळीत २० लाख ५२ हजार किमीच्या प्रवासातून १० कोटी ७५ लाख ४८ हजारांचे तर गतवर्षी १९ लाख ४९ हजार किमी प्रवासातून ९ कोटी ६० लाख ४८ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले होते. बीड जिल्ह्याने यंदा २० लाख ९५ हजार किमीतून ११ कोटी ४२ लाख ७ हजार रुपयांचे तर गतवर्षी २० लाख २५ हजार किमीतून ९ कोटी ४४ लाख रुपयांची कमाई केली होती. जालना जिल्ह्याने गतवर्षी ९ लाख ४३ हजार किमीतून ४ कोटी ५० लाखांची तर यंदा १० लाख ९ हजार किमीमधून ५ कोटी १५ लाख ८७ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.
नांदेडने यंदा १९ लाख ८९ हजार किमीच्या प्रवासातून १० कोटी १४ लाख १० हजार रुपयांचे तर गतवर्षी १८ लाख ४६ हजार किमीमधून ९ कोटी २६ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले होते. धाराशिव विभागाने यंदा १५ लाख ८० हजार किमीमधून ८ कोटी ४५ लाख २६ हजार रुपयांचे तर गतवर्षी १५ लाख ८७ हजार किमीतून ७ कोटी ९६ लाख ५४ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले होते. तर परभणी विभागाने यंदा १५ लाख ७८ हजार किमीतून ८ कोटी ४७ लाख ५८ हजार तर गतवर्षी १४ लाख ९२ हजार किमीतून ७ कोटी ५५ लाख ५१ हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले होते. गतवर्षीच्या तुलनेत १५ टक्क्यांपेक्षा अधिक उत्पन्न मिळवण्याचे निकष ठरवण्यात आले होते. यामध्ये धाराशिव व नांदेड विभागाची कामगिरी सुमार राहिली, अशी माहिती राज्य परिवहन विभागाकडून मिळाली.
