अहिल्यानगर : बनावट नोटा तयार करणारा छत्रपती संभाजीनगर शहराजवळील कारखाना व या बनावट नोटा बाजारात वितरित करणारे रॅकेट अहिल्यानगर तालुका पोलिसांनी उघडकीस आणले आहे. एकूण ७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र मुख्य सूत्रधार फरार झाला. पोलिसांनी ५९ लाख ५० हजार रुपये रुपयांच्या ५०० दराच्या बनावटांसह २ कोटी १६ लाख रुपयाच्या बनावट नोटा तयार तयार होतील, असा कागद, आधुनिक छपाई यंत्र असा एकूण ८८ लाख २० हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आज, शुक्रवारी या कारवाईची माहिती दिली. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, तपासी अधिकारी नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक प्रल्हाद गीते आदी यावेळी उपस्थित होते.

निखिल शिवाजी गांगर्डे (वय २७, कोंभळी, ता. कर्जत), सोमनाथ माणिक शिंदे (वय २५, तपोवन रस्ता, अहिल्यानगर), प्रदीप संजय कापरे ( वय २८, तिंतरवणी, शिरूर कासार, बीड), मंगेश पंढरी शिरसाठ (वय ४०, शिवाजीनगर, छत्रपती संभाजीनगर), विनोद दामोदर अरबट (वय ५३, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर), आकाश बनसोडे (वय २७, निसर्ग कॉलनी, पेठेनगर छत्रपती संभाजीनगर) व अनिल सुधाकर पवार (वय ३६, मुकुंदनगर, छत्रपती संभाजीनगर) या ७ जणांना अटक करण्यात आली आहे तर मुख्य सूत्रधार अंबादास रामभाऊ ससाने (रा. शहरटाकळी, शेवगाव, अहिल्यानगर) हा फरार आहे.

सहायक पोलीस निरीक्षक गीते यांना सोलापूर रस्त्यावरील अंबिलवाडी (अहिल्यानगर) शिवारात बनावट नोटा बाजारात आणणारे दोघे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार २७ जुलैला त्यांनी सापळा रचून निखिल गांगर्डे व सोमनाथ शिंदे या दोघांना अटक केली. त्यानंतर तपासात प्रदीप कापरे याला अटक करण्यात आली. त्याच्या माहितीनुसार नेवासा फाटा येथे एक जण ५० हजार रुपयांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात १ लाखांच्या बनावट नोटा देणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार नेवासा फाटा येथे सापळा रचण्यात आला तेथे विनोद अरबट याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून ३ लाख रुपये रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. त्याच्याकडून माहिती मिळाल्यानुसार बनावट नोटा तयार करणारा कारखाना छत्रपती संभाजीनगर शहराजवळ असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आकाश बनसोडे, मंगेश शिरसाट व अधीर पवार यांना अटक करण्यात आली. मात्र त्यावेळी तेथे असलेला अंबादास ससाने हा पसार झाला. आरबट व शिरसाठ यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगरच्या शहराजवळील वाळुंज शिवारातील तिसगाव येथे एका भाड्याच्या खोलीत बनावट नोटा तयार करणारा कारखाना टाकण्यात आला होता.

कारागृहातील ओळखीतून झाली टोळी तयार

अंबादास ससाने याला पूर्वी बनावट नोटा तयार करण्याच्या उद्योगात अटक करण्यात आली होती. तो औरंगाबादच्या हरसुल कारागृहात होता. त्याचवेळी अन्य गुन्ह्यात अटक असलेले मंगेश शिरसाठ व आकाश बनसोडे हे दोघेही कारागृहातच होते. तिथे त्यांची ओळख झाली ससाणे यांने शिरसाट व बनसोडे या दोघांना बनवून नोटा बाजारात आणण्याचे अमिष दाखवले.

दोन गुन्हे आणि कर्जतचे आरोपी

नगर जिल्ह्यातील राहुरी पोलिसांनी गेल्या महिन्यातच बनावट नोटा तयार करून बाजारात आणणारा टेंभुर्णी (सोलापूर) येथील कारखाना उघडकीस आणला होता. या गुन्ह्यात तिघांना अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यातही व आज उघडकीस आलेल्या गुन्ह्यातही कर्जत तालुक्यातील आरोपींचा समावेश आहे. त्यामुळे दोन्ही गुन्ह्यांचे परस्पर संबंध आहे का, याचा तपास केला जाणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक घार्गे यांनी सांगितले.

सिगारेटच्या पाकिटासाठी पाचशे रुपये

बनावट नोटा तयार करणारे दोन्ही कारखाने परजिल्ह्यात म्हणजे सोलापूर व छत्रपती संभाजीनगरमध्ये होते. मात्र बनावट नोटा बाजारात वितरण नगर जिल्ह्यात होत होते. नगर तालुका पोलिसांनी उघडकीस आणलेल्या टोळीतील आरोपी अंबिलवाडी शिवारातील एका पानटपरीवर दोनदा पाचशे रुपयांच्या दराच्या नोटा देऊन सिगारेटचे पाकीट खरेदी केल्याने टपरीचालकाला संशयाला व त्याने पोलिसांना माहिती दिली.

बँक अधिकाऱ्यांची बैठक घेणार

जिल्ह्यात दोन गुन्हे दाखल झाल्याने व यातील आज पकडलेली एक टोळी सन २०२१ पासून बनावट नोटा तयार करत असल्याचे आढळल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्ह्यातील प्रमुख बँकांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक बोलावून सूचना केल्या जातील. बनावट नोटांमध्ये बँकांची महत्त्वाची भूमिका ठरते. एखादा ग्राहक सारखा बनावट नोटा घेऊन येत असेल तर बँकांना संशय आला पाहिजे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक घार्गे यांनी सांगितले.