छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजास इतर मागास प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या नव्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी मागच्या बाकावरचे नेते बुधवारी ‘जल्लोषात’ आवर्जून सहभागी झाल्याचे दिसून आले. प्रत्येक जिल्ह्यात भाजपने आरक्षण दिले आहे, असा संदेश जावा यासाठी चौकाचौकांत आरक्षणाचे ढोल-ताशे वाजवण्यात आले. शहरातील क्रांती चौकात जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
मुंबईत गुलाल उधळून मनोज जरांगे हे उपचारासाठी म्हणून शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. त्यांनी सकाळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला, ‘ मराठवाड्यातील सर्वांना नव्या आदेशामुळे लाभ होईल. सर्वांना प्रमाणपत्रे मिळू शकतील. काढलेल्या तीन शासन निर्णयामुळे मराठा समाजाला फायदा होईल. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांना आरक्षण मिळेल. काही जण शंकाकुशंका घेणारे आहेत. पण ते कधीच आपल्या बाजूने नव्हते,’ असे जरांगे म्हणाले. हैदराबाद गॅझेट लागू झाले आहे म्हणजे काय, याचा तपशीलही काही मराठा नेते विचारू लागले आहेत. आरक्षण मागणीच्या तीन शासन निर्णयाच्या अनुषंगाने मराठवाड्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा अधिक उजळून निघेल, असे प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे.
मराठा आरक्षण आंदोलनात मराठवाड्यातील नेते तसे मागच्या बाकावरच होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना उदय सामंत, तत्कालीन रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे, दादा भुसे असा चमू संवाद साधत असे. तेव्हा अधुनमधून हजेरी लावण्यासाठी भाजपचे अतुल सावे जात. भाजपमध्ये गेल्यानंतर अशोक चव्हाण यांनीही जरांगे यांची एकदा उशिरा रात्री भेट घेतली होती. अन्य भाजपचे नेते जरांगे यांच्या आंदोलनात फारसे पुढे येत नव्हते. आरक्षणाबाबतचे तीन शासन निर्णय निघाल्यानंतर भाजपचे मागच्या बाकावर असणारे सर्व कार्यकर्ते बुधवारी जल्लोष करताना दिसून आले. नांदेड, हिंगोलीसह प्रत्येक जिल्ह्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.