छत्रपती संभाजीनगर : अवर्षणग्रस्त आणि सरासरी ६०० ते ७०० च्या आसपास पर्जन्यमान असलेल्या मराठवाड्यात यंदा अतिवृष्टी आणि ९०० ते एक हजार मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. यातून शेतीतील कापूस, तूर, सोयाबीन, मका आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले.

विशेषत: अवर्षणग्रस्त मराठवाड्यात घेतले जाणाऱ्या कापसाच्या पिकाला मोठा फटका बसला असून, गतवर्षीपेक्षा यंदा ४० ते ५० टक्क्यांवर तूट असल्याचा अभ्यासक आणि शेतकऱ्यांचा अंदाज आहे. तर शासकीय हमीभावापेक्षा दीड हजार रुपयांनी कमी दराने खासगी जिनिंगचालकांकडे कापूस विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

अतिवृष्टीने कापसाचे बोंड सडून गेले, पाने गळून पडली. काही ठिकाणी बाेंडं पिवळी पडली. तत्पूर्वी अनेक भागात पेरणी वेळेवर झालेली नाही. तर अतिवृष्टीने गोदाकाठच्या परिसरातील कापूस पाण्यात गेला. कापूस पणन महासंघाकडून (सीसीआय) यावेळी नवीन उपयोजन (ॲप) तयार करून त्याद्वारेच नोंदणी करावी, असा दंडक घालून देण्यात आला असून, नवीन उपयोजनावर नोंदणी न करणाऱ्यांच्या कापसाची खरेदीही होणार नसल्याचे सांगण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण आहे.

सीसीआयने १ ते ३० सप्टेंबरदरम्यान नोंदणीचा कालावधी निश्चित केला होता. परंतु, शेतकऱ्यांकडून नोंदणीमध्ये अडचणी येत असल्याच्या तांत्रिक तक्रारी पुढे आल्याने एक महिन्याची म्हणजे ऑक्टोबरअखेरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली. या दरम्यानच दिवाळी असून, घरात खर्चासाठी पैसाही आवश्यक असल्याने शासकीय मदतीची वाट किती काळ पाहावी, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.

शेतकरी खासगी जिनिंगमध्ये कापूस विक्रीसाठी नेत आहेत. परंतु, खासगी जिनिंगचालकांकडे शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा दीड हजारावर रकमेने कमी दराने कापूस विक्री करावा लागत आहे. शासकीय हमीभाव आठ हजार १०० रुपये असून, खासगी जिनिंगचालकांकडे साडेसहा हजार ते सात हजारांपर्यंतचाच दर कापूस पाहून मिळत आहे, असे शेतकरी सांगत आहेत.

मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे कापसाच्या उताऱ्यात कमालीची घट आहे. गतवर्षीच्या तुलनेत ४० ते ५० टक्के तूट आहे. शेतकऱ्यांकडचा कापूस पाहून खरेदी सुरू आहे. बरेच शेतकरी अद्याप कापूस विक्रीच्या तयारी दिसत नाहीत. आंतरराष्ट्रीय घडामोडींवरूनही कापसाचा दर ठरतो आणि त्यानुसार खरेदी केली जाते. – ओंकार खुर्पे.

ऐन दिवाळीतही पाऊस झाला. लक्ष्मीपूजनापासून ते भाऊबीजेलाही पावसाची बरसात झाली. त्यामुळे विक्री करण्यासाठी ठेवलेला कापूसही भिजला. त्यामुळे शेतकऱ्यांकडे कापूस विक्रीसाठी म्हणून राहिलेला नव्हता. मिळेल त्या किमतीत कापूस विकण्याची वेळ आली आहे. – शहादेव सुरासे, शेतकरी.