छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील पाऊस पूर्णत: थांबला असला, तरी नगर व नाशिक जिल्ह्यातील पावसामुळे जायकवाडी जलाशयात तीन लाख सात हजार प्रतिसेकंद घनफूट वेगाने विसर्ग करावा लागल्याने गोदावरी नदी पट्ट्यात पूरस्थितीचे गांभीर्य रविवारी वाढले होते. पैठण शहरात पाणी घुसले. पैठण, माजलगाव आणि गेवराईतील स्थिती गंभीर होती. आतापर्यंत १७ हजार ८८५ जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. या दरम्यान गेल्या २४ तासांत सात जणांचा मृत्यू झाला. यात चाैघे जण पुरात वाहून गेले. दरम्यान, या पुरामुळे पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले असून, त्याच्या दुरुस्तीसाठी दोन हजार ४३२ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी लागेल असा अंदाज प्रशासनाने राज्य सरकारला कळवला आहे.
जायकवाडी धरणातून रात्री साडेदहाच्या सुमारास तीन लाखांहून अधिक प्रतिसेकंद घनफूट वेगाने पाणी सोडले. गोदाकाठी सुरक्षितेसाठी प्रशासनाला कसरत करावी लागली. पैठणमधील १४ गावांतून संभाव्य पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलविण्याची तयारी दुपारपासून सुरू करण्यात आली होती. रात्री पैठणच्या नाथ मंदिरात पाणी वाढत गेले. गागाभट्ट चौक, जुनी बाजारपेठेत या भागात पाणी शिरले.
जालना जिल्ह्यातून सर्वाधिक आठ हजार जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. संपूर्ण जिल्ह्यातील उपनद्यांमध्येही पूर आल्याने जिल्हाभर प्रशासन जागे होते. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पैठणच्या नाथसागरातून विसर्ग कमी करण्यात आला. तो आता एक लाख ७५ हजारांपर्यंत खाली आला आहे. सिंदफणा नदीच्या परिसरातील गावांमध्ये पूर परिस्थिती कायम आहे. या भागातील अनेक गावांत पाणी पसरत आहे. पाऊस थांबल्याने आजपासून पंचनाम्याला वेग येईल, असा दावा विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केला.
पुरामुळे ग्रामीण रस्ते व पुलांची वाताहत
पुरामुळे मराठवाड्यातील २७०१ किलोमीटरचे रस्ते, १५०४ पूल, २२२ तलाव, १०६४ शाळा, ९५६७ विजेचे खांब, ५८ शासकीय इमारती, ३९२ पाणी पुरवठ्याच्या याेजना नादुरस्त झाल्या. या सर्व योजना पूर्वपदावर आणण्यासाठी २४३२ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे.
बचाव कार्यातून ४१२ जणांची सुटका
पुरात अडकलेल्या ४१२ जणांची सुटका करण्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन व लष्करी जवानांना यश आले. जायकवाडी धरणातून ३ लाख ५० हजार क्युसेक पाणी सोडले असते, तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकली असती. पण, सुदैवाने ती वेळ आली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, अजूनही बीड, परभणी, नांदेड जिल्ह्यात पूरस्थिती कायम आहे.