भूम तालुक्यातून पुणे, हैदराबादपर्यंतची बाजारपेठ
पहाटेपासून खवा बनविण्यासाठी धावपळ.. उत्पादकांनी सकाळीच भट्टीवर दूध आणून दिल्यानंतर भट्टी सुरू.. एका मोठय़ा कढईत ओतलेले दूध घोटण्याचीची लगबग..हे चित्र आहे भूम तालुक्यातील कुंथलगिरीमधले. अशा सुमारे ५०० भट्टय़ांतून प्रतिदिन ६० टन खवा कुंथलगिरीसारख्या छोटय़ाशा गावातून हैदराबाद आणि पुण्यापर्यंत पोहोचतो.
उत्पादित झालेल्या खव्याचे २० किलोचे भाग केले जातात. त्याला डाग म्हटले जाते. या डागाला पोते गुंडाळून पाण्याचा शिडकावा दिला जातो. हे पोते म्हणजे वातानुकूलित यंत्रणा. या पोत्यांवर हिरव्या रंगाने नावे आणि फोन क्रमांक लिहिला जातो आणि एस.टी.च्या टपावर किंवा खासगी वाहनाने ते पाठविले जातात. ६० टन खव्याचे हे व्यवस्थापन मुंबईतील डबेवाल्यांच्या धर्तीवरच आहे. भूम तालुक्यातून महिन्याला ३२ लाख रुपयांचा खवा शहरांमध्ये पोहोचतो. या व्यवसायाला अधिक उभारी मिळावी, यासाठी राज्य सरकारने कुंथलगिरी येथे खवा क्लस्टर उभारण्याचा निर्णय अलीकडेच घेतला आहे.
भूम तालुका हा उस्मानाबाद जिल्ह्य़ातील डोंगराळ भाग. बालाघाटाच्या कुशीत दुग्ध उत्पादन हाच शेतकऱ्यांचा मोठा व्यवसाय. दररोज सुमारे सहा लाख लिटरहून अधिक दूध उत्पादन केले जाते. त्यामुळे राज्यातील बहुतांश दूध संघांची संकलन केंद्रे भूममध्ये आहेत. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात उत्पादित होणारे दूध टिकविण्यासाठी पर्याय म्हणून खवा व्यवसायाचा जन्म झाला. तालुक्यातील बहुतांश भाग डोंगराळ असल्याने रस्ते नव्हते. मोठय़ा प्रमाणात उत्पादित झालेल्या दुधाची नासाडी होऊ नये म्हणून पर्याय शोधले जाऊ लागले आणि शंभर वर्षांपूर्वी या भागात खवा व्यवसायाला सुरुवात झाली. दळणवळणाची साधने नसताना घोडे, गाढव, खेचर या प्राण्यांच्या पाठीवर खवा लादून तो व्यापाऱ्यांकडे पाठवला जात होता. परिणामी माल व्यापाऱ्यापर्यंत पोहोचण्यास अधिक वेळ जाऊ लागला.
वाटेत खव्याची नासाडी होऊ लागली. तो जास्त काळ टिकावा यासाठी नवी शक्कल लढविण्यात आली. कुिलगसाठी भिजवलेल्या पोत्याचा तेव्हापासून वापर सुरू झाला, जो आजतागायत सुरू आहे. खव्यामध्ये साखर मिसळल्यावर तो अधिक काळ टिकतो असे कळाले आणि कुंथलगिरीचा पेढा पुढे आला. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर सरमकुंडी येथे पेढय़ाची बाजारपेठ आज सर्वाचेच लक्ष वेधून घेत आहे.
कसा तयार होतो खवा?
- एकटय़ा भूम तालुक्यात पाचशेहून अधिक खवा भट्टय़ा आहेत. उत्पादित होत असलेल्या दुधापकी अडीच ते तीन लाख लिटर दुधाचा दररोज खवा तयार केला जातो.
- तालुक्यात ५० हजारांहून अधिक दूध उत्पादक शेतकरी दररोज सरासरी १० ते १५ लिटर दूध उत्पादित करतात. त्यातील निम्म्याहून अधिक जण खवा भट्टीला प्राधान्य देतात.
- चार ते पाच लिटर चांगले दूध भट्टीवर ठेवल्यानंतर त्यातून पिवळसर रंगाचा एक किलो खवा बनतो. अनेक ठिकाणी आजही खवा पारंपरिक पद्धतीने चुलीवर तयार केला जात आहे.
- त्यामुळे इंधनावर भट्टीचालकांचा मोठय़ा प्रमाणात खर्च होतो. दूध उत्पादक २० रुपये लिटर दराने खवा उत्पादकांना दूध देतात.
- शंभर रुपयांचे दूध आटवून खवा तयार झाल्यावर व्यापारी १२५ रुपये प्रति किलो दराने खरेदी करतात आणि बाजारात १६० ते १८० रुपये दराने खवा विक्री होते.
असा पोचतो खवा
सकाळी दहा वाजेपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सर्व डाग तालुक्याच्या ठिकाणी एकत्र गोळा होतात. डागावर नाव आणि नंबर अशी विशिष्ट ओळख दिली जाते. उत्पादित खव्यापकी जवळपास ८० टक्के खवा हैदराबाद आणि पुणे येथील व्यापारी खरेदी करतात आणि तेथून देशाच्या विविध भागांत या डागांचा प्रवास सुरू होतो. त्याचबरोबर महाराष्ट्रात सातारा, सोलापूर, औरंगाबाद येथील व्यापारीही मोठय़ा प्रमाणात खवा खरेदी करतात. खासगी वाहन, बसच्या टपावरून खव्यांच्या डागांचा वर्षांनुवर्षांपासून हा प्रवास सुरूआहे. कधी डाग हरवले नाहीत की, कधी व्यापाऱ्यांची तक्रार नाही. भूम, येरमाळा, सरमकुंडी येथून निघालेले डाग अनेक गाडय़ा बदलत दररोज प्रवास करीत आहे.
राज्यातील पहिला क्लस्टर
खवा तयार करणारा विकत नव्हता आणि विकणारा कधीच तयार करीत नव्हता. त्यामुळे दूध उत्पादक आणि भट्टीचालकांच्या तुलनेत व्यापारीवर्गाला अधिक आर्थिक लाभ होत होता. समूह उद्योगाला चालना मिळावी यासाठी राज्य सरकारने २२ क्लस्टर निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. पकी खव्याचा पहिला क्लस्टर राज्य सरकारने जाहीर केला आहे. यासाठी पाच कोटी रुपयांचे अनुदानही देण्यात आले आहे.