छत्रपती संभाजीनगर : राजसंस्था, धर्म, बाजारपेठ यांची युती झाली आहे. त्यामुळे त्याचा विरोध हा स्वायत्त नागरी समाजच करू शकतो. पण असा समाज घडविण्यासाठी बुद्धिवंतांनी आपल्या सरकारवर टीका केली पाहिजे तेही उपकृत न होता. असे करताना बंधुभावही जपावा लागेल, त्याचा प्रचार करावा लागेल, असे मत लेखक व कार्यकर्ते मिलिंद बोकील यांनी व्यक्त केले. मुक्तिसंग्रामातील अग्रणी व सापेक्षी संपादक अनंत भालेराव स्मृती पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर सुधीर रसाळ, सविता पानट, मधुकर मुळे यांची उपस्थिती होती.

‘सद्यस्थितीतील बुद्धीवंतांचे कार्य’ या विषयावर बोलताना मिलिंद बोकील म्हणाले, आपल्याकडे देवभोळेपणा आणि धर्मभोळेपणा वाढतो आहे. वाढवलाही जातो आहे. अस्मितावर्धक विचार वाढविण्याची ही प्रक्रिया काही शतकांपासून सुरू आहे. आता धर्मभोळेपणाला व्यापारी रूपही समोर येत आहे. आता हे सारे पुरे, असे म्हणून सृष्टी निर्मितीचे गुढ न उकलल्याने काही काळापर्यंत त्यातील भोळेपणा समजू शकला असता पण आजच्या विज्ञान युगातही कोणीतरी शंख, चक्र, गदाधारी हे सारे चालवतो आहे, हे समजून चालणेच मुळात उपयोगाचे नाही. आपल्या धर्म व उपासना पद्धती घरातच ठेवायला पाहिजेत. तरीही देवाची एक सगुण- साकार मूर्ती बनवायची असेल तर ती घरापर्यंत असावी. स्वधर्म ही आपली संकल्पना व्यक्तीगत पातळीवरची आहे. आपण धर्माला रस्त्यावर आणून जे काही करतो आहोत, तो एक प्रकारचा गुन्हा आहे. देशातील धर्माचे जी पारंपरिक पद्धत आहे आणि उपासना रुपे आहेत त्याला सामाजिक पातळीवर आणायचे असेल तर ती धम्म म्हणून पुढे यायला हवी. धम्म म्हणजे सामाजिक नीती. सोप्या भाषेत म्हणायचे तर दुसऱ्यांशी वागायची पद्धत. आपले सामाजिक जीवन असेच असायला हवे. सौजन्य, सहिष्णुता, सहजीवन या सगळय़ा गोष्टी धम्म या एका संज्ञेमध्ये एकवटल्या आहेत. धम्म कसा आणायचा तर दुसऱ्यांना त्रास होणार नाही, असे वागण्याची रीत. पण प्रत्यक्षात वेगळेच घडविले जात आहे. याकडे बुद्धीवंतांनी पहायला हवे.

हेही वाचा >>>मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजी नगरमध्ये २८ वर्षीय तरुणाची आत्महत्या, फलकावर लिहिला ‘हा’ संदेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 लोकप्रतिनिधींची कार्याबाबत नसलेली स्पष्टता, आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधीने काय करावे, कोणते काम करावे, हे लोकशाहीत ठरवूनच दिले नाही. ‘राईट टू रीकॉल’ हे सारे अजून तरी कागदावरच आहे. त्यांच्या कामाचे आऊटपुट काय, त्याचे मूल्यमापन करावे लागणार आहे. असे करताना बुद्धिवादी मंडळींनी दोन प्रकारचे व्यवहार अंमलात येतील असे पहावे, ते म्हणजे शिक्षा आणि उपेक्षा. ज्यांनी चुकीचे काम केले त्यांना शिक्षा आणि अग्रभागी होणारी पूजा थांबवली पाहिजे. सध्याच्या काळात पाच-दहा अपवाद वगळता बहुतेक नेत्यांना आता घरी बसा, असे सांगण्याची वेळ आली आहे. त्यातही शीर्षस्थ नेत्यांसाठी तर ती बाब अधिक लागू असल्याचेही सांगण्याची गरज आहे. हे सारे करताना बुद्धीवंतांनी राजसत्तेवर टीका करणे सोडता कामा नये.