औरंगाबादेत ३२ महिलांचे प्रशिक्षण सुरू
बिपिन देशपांडे, लोकसत्ता
औरंगाबाद : ‘तू चालक होणार का? तीही एसटी बससारख्या अवजड वाहनाची? कसे पेलू शकशील तू हे आव्हान?’ अशी हेटाळणी त्यांच्या कुटुंबातूनच होत होती, पण हे आव्हान आम्ही पेलून दाखवू, असे त्या ३२ जणींचे उत्तर होते. या ३२ जणी म्हणजे औरंगाबादमध्ये चालक प्रशिक्षण घेणाऱ्या महिला.
पोलीस दलात खाकी वर्दी परिधान करण्याची संधी मिळाली नाही म्हणून काय झाले, चालक होऊन ती इच्छा पूर्ण करू आणि एक अवघड वाटणारे काम करू, अशा आत्मविश्वासाने त्यांनी एसटीचे स्टेअरिंग हाती घेतले आहे. विशेष म्हणजे यापैकी बहुतांश महिला विवाहित, सामान्य, शेतकरी कुटुंबातील आहेत. औरंगाबाद, जालना, परभणी, नाशिक, धुळे, अहमदनगर येथील मिळून ३२ महिलांचे प्रशिक्षण औरंगाबाद विभागीय केंद्रात सुरू आहे.
चालक प्रशिक्षण घेणाऱ्या पूजा मते म्हणाल्या, ‘मी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आणि चांगल्या नोकरीच्या दृष्टीने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. पोलीस उपनिरीक्षक व्हायची इच्छा होती. त्यासाठी प्रयत्नही केले. पण राज्य परिवहन महामंडळाची जाहिरात पाहिली आणि चालक म्हणून नोकरी करण्याचे आव्हान स्वीकारले. सुरुवातीला कुटुंबातून खूप विरोध झाला, पण आता पाठबळ देऊन अभिमान बाळगला जात आहे.’
परभणीच्या रमा गायकवाड यांच्या घरची परिस्थिती अगदी जेमतेम. त्या म्हणाल्या, पायलट, रेल्वे चालक म्हणूनही महिला पुढे येत असल्या तरी एसटीसारखे ३६ फूट लांब आणि आठ फूट रुंद वाहन चालवणाऱ्या महिला मराठवाडय़ात नव्हत्याच. एक आव्हानात्मक काम करण्याची ऊर्मीही होती. म्हणून चालक होण्याचा निर्णय घेतला.’
बीडच्या विजू वाहूळ आणि मंजू रांजणकर या दोघीही औरंगाबादेत प्रशिक्षण घेत आहेत. विजू वाहूळ म्हणाल्या, ‘मी शेतकरी कुटुंबातील. आई- वडील, तीन भाऊ आहेत. मुलगी म्हणून घरात मी एकटीच. चालक वाहन कसे चालवतात, याविषयी कायम उत्सुकता होती. हे काम जोखमीचे आणि धाडसाचेही. म्हणून हे आव्हान स्वीकारावे असे वाटले.’
ऑइल ब्रेकच्या तुलनेत ‘एअर ब्रेक’ हाताळायला सोपे असते. महिलांना एक वर्षांचे प्रशिक्षण देणार आहोत. तीन महिन्यांनंतर त्यांच्यातील गुणदोष दाखवू. भोसरीला संगणकीय चाचणी होणार आहे. ८० दिवसांचे सेवापूर्व प्रशिक्षण देणार आहोत. पुरुषांप्रमाणेच त्याही बस उत्तम रीतीने चालवतील.
– अनंत पवार, वाहतूक निरीक्षक (प्रशिक्षण) औरंगाबाद
चालक प्रशिक्षण घेणाऱ्या महिला
जयश्री आरके, रमाबाई गायकवाड, विजू वाव्हळ, पूजा मते, मंजू रांजणकर, शारदा गोरे (औरंगाबाद), रेशमा शेख, सोनाली भाग्यवंत, योगिता टेकाळे (परभणी), पल्लवी बेलदार (धुळे), मीरा इंझे (जालना), माधवी साळवे, चताली आल्हाट, ज्योती अहिरे, मंजिरी जाधव, पूजा गांगुर्डे, सुनीता वाघमारे, सुषमा कर्डक, स्वाती गांगुर्डे, हिरा भोये, संगीता चौधरी, ज्योती पवार (नाशिक), प्रीती काळे, ज्योती आखाडे, कीर्ती पगारे, माधुरी भालेराव, रूपाली पगारे, शुभांगी केदार, संगीता भालेराव, शीतल अहिरराव, सुनीता पाटील (जळगाव), अवनिता शिर्के, आशा खंडीजोड, सोनाली भागडे, सुनंदा सोनवणे (अहमदनगर).
वर्षभरात २१३ महिला चालक सेवेत
* येत्या आर्थिक वर्षांत आदिवासी आणि दुष्काळग्रस्त भागातील २१३ महिला चालक-वाहक म्हणून सेवेत येणार आहेत.
* आदिवासी भागातील २१ महिलांचे अंतिम प्रशिक्षण सुरू असून प्रथम याच महिला सप्टेंबर २०२० पर्यंत एसटीत दाखल होतील.
* त्यानंतर चार ते पाच महिन्यांनी दुष्काळग्रस्त भागातील महिलाही रुजू होतील.