अनाथांच्या उत्थानासाठी मदतीची गरज 

भूकंपामुळे उद्ध्वस्त झालेली मुले सावरली. पण वेगवेगळ्या कारणांनी अनाथ झालेली संख्या आजही खूप आहे.

‘आपलं घर’ला सावरूया!

औरंगाबाद : अठ्ठावीस वर्षांपूर्वी भूकंपामुळे अनाथ-पोरक्या झालेल्या मुलांना राष्ट्रसेवा दलाच्या ‘आपलं घर’ या संस्थेने आधार दिला. अनेकांचे आयुष्य घडविले. व्रतस्थपणे काम करणाऱ्या या संस्थेला मिळणारा निधी शासनाच्या धरसोडीच्या धोरणामुळे आणि करोनामुळे थांबला. त्यामुळे समाज सहकार्यातून उभ्या राहिलेल्या या प्रकल्पासाठी निधी संकलन हे आता पुन्हा प्राधान्याचे काम बनले आहे.

एखादी सामाजिक संस्था सरकारी अनुदानावर आली की तिला मदतीची गरज काय, असा प्रश्न विचारणारा एक वर्ग असतो. पण, शासकीय अनुदान मिळविण्यासाठी लागणारा लुच्चेपणा संस्थेच्या कारभारात नसेल तर सामाजिक संस्थेचे काय होते, याचे उदाहरण म्हणून ‘आपलं घर’ या संस्थेकडे पाहावे. मुलांचे संगोपन करणे हे कर्तव्यच या भावनेतून अनेक वर्षे काम करणाऱ्या संस्थेचे थकलेले अनुदान २५ लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे आर्थिक अडचणी वाढत गेल्या. नव्याने शिकणाऱ्या मुलांच्या जगण्यासाठी लागणारी रक्कम गोळा करण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागले आहेत. त्यात वयाच्या ८९व्या वर्षी या संस्थेसाठी अहोरात्र काम करणारे सामाजिक कार्यकर्ते पन्नालाल सुराणा हे अग्रभागी आहेत.

भूकंपामुळे उद्ध्वस्त झालेली मुले सावरली. पण वेगवेगळ्या कारणांनी अनाथ झालेली संख्या आजही खूप आहे. आई-वडील गुन्हेगार असणारी मुले, रस्त्यावर टाकून दिलेल्या मुलांसाठी आता ‘आपलं घर’ काम करत आहे. महिला बाल कल्याण समितीकडे पालकत्व नसलेल्या मुलांना घर देणाऱ्या कार्यकर्त्यांची फळीही राष्ट्र सेवा दलाने विकसित केली आहे. सलग २८ वर्षे कार्यकर्ते समर्पण भावनेने काम करत आहेत. पण त्यांना मिळणारे तुटपुंजे मानधन आणि संस्थेचा दैनंदिन खर्च भागविण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. करोनामुळे मिळणारी मदतही आटत चालली आहे. मुलांचे प्रश्न सोडविताना धर्मनिरपेक्ष, जातीप्रथा निर्मूलन आणि अंधश्रद्धेला खतपाणी न घालणाऱ्या समाज निर्मितीच्या कामात सहभागी असलेले कार्यकर्ते केवळ पालन पोषणाच्या समस्येत अडकून पडू लागले आहेत.

भूकंपानंतर उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या अनेक स्वयंसेवी संस्थांच्या कार्यशैलीवर सकारात्मक परिणाम घडवून आणणाऱ्या ‘आपलं घर’ या संस्थेला नव्याने आर्थिक मदतीची गरज आहे. यापूर्वी ‘लोकसत्ता’सह विविध माध्यम समूहांनी या संस्थेच्या उभारणीत मदत केली होती. पण, करोना संकटानंतर अडचणीत अधिक भर पडल्याने आता मदतीची आणि सहकार्याची गरज असल्याचे ‘आपलं घर’चे व्यवस्थापक विलास वकील यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Need for help in the upliftment of orphans akp

ताज्या बातम्या