छत्रपती संभाजीनगर : शक्तिपीठ महामार्गाच्या जमीनमोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा विरोध पाहूनच परतण्याची वेळ परळी-अंबाजोगाई तालुक्यांत शनिवारी आली. या संदर्भात परळीत शुक्रवारी आमदार धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणारी बैठकही रद्द करण्यात आली होती. परळी व अंबाजोगाई तालुक्यातील भोपळा, तळेगाव, इंजेगाव, डाबी, कन्हेरवाडी येथे शनिवारी माेजणी करण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांचे एक पथक दाखल झाले होते. परंतु शेतकऱ्यांनी काही शंका उपस्थित करून मोजणी थांबवली. कन्हेरवाडी येथे दोन-तीन शेतकऱ्यांनी मोजणी करू दिल्याची माहिती प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून मिळाली.

दरम्यान, शक्तिपीठ महामार्ग हा परळी, अंबाजोगाई तालुक्यांतून जात असून, दोन दिवसांपूर्वीच रास्ता रोको करून या महामार्गाला विरोध दर्शवण्यात आला होता. शेतकऱ्यांचा विरोध पाहता आमदार धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली परळीतील नटराज रंगमंदिरात शुक्रवारी एका बैठकीचे आयोजनही करण्यात आले होते. मात्र, अंबाजोगाई तालुक्यात येणाऱ्या आणि परळी विधानसभा मतदारसंघाशी जोडलेल्या गावांमधून विरोधाचे सूर अधिक उमटतील, अशी शक्यता निर्माण झाल्याने परळीच्या उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाकडून धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली होणारी बैठक काही अपरिहार्य कारणास्तव रद्द करण्यात आल्याचे पत्रकच काढण्यात आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भोपळा, कन्हेरवाडी येथे मोजणीसाठी पथक पोहोचले होते. पावसामुळे मोजणी थांबवली. डाबीमध्ये शेतकऱ्यांनी मोजणीबाबत शंका उपस्थित केली होती. अरविंद लाठकर, उपविभागीय अधिकारी, परळी