छत्रपती संभाजीनगर : गत विधानसभा निवडणुकीदरम्यान नऊ मद्य परवाने असल्याच्या आरोपानंतर दोन मद्य परवाने निवडणूक शपथपत्रात नमूद करणारे तत्कालीन रोहयो मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांच्या भावजयीच्या नावे मद्य परवाना स्थलांतरित करताना शासकीय यंत्रणेने वायू वेगात काम केल्याचे तपशील नमूद करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल आहे.
याप्रकरणी दोन वेगवेगळ्या याचिकांमध्ये विभागीय आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), गंगापूरचे गटविकास अधिकारी आदी प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. या याचिकेवर आता १९ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
खासदार संदीपान भुमरे यांच्या भावजयी छाया राजू भुमरे यांना देशी दारूचे किरकोळ दुकान सुरू करण्याबाबतचा ठराव १३ ऑक्टोबर २०२३ रोजी पांढरओहळ ग्रामपंचायतीने मंजूर केला. त्यानंतर ८ डिसेंबर २०२३ रोजी खरेदी केलेल्या मुद्रांक शुल्कावर छाया भुमरे यांनी स्वयंघोषणापत्र सादर करताना मुंबईतील जोगेश्वरी (पश्चिम) भागातील ओशिवरा व्हिलेज येथील डिसोझा बारचा नूतनीकरण केलेला परवाना स्थलांतरित करण्यासाठीचा अर्ज मुंबई जिल्हाधिकाऱ्यांकडे १ डिसेंबर रोजी म्हणजे आठ दिवसांपूर्वीच सादर केलेला आहे, असे नमूद केले आहे.
या अर्जाबाबतचा जबाब राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उपअधीक्षकांनी दुसऱ्याच दिवशी म्हणजे ९ डिसेंबर रोजी समक्ष घेतल्याची स्वाक्षरी केली. आश्चर्य असे की तत्पूर्वीच म्हणजे एक दिवस आधीच (८ डिसेंबर) उत्पादन शुल्क विभागाच्या छत्रपती संभाजीनगरच्या अधीक्षकांनी छाया राजू भुमरे यांच्या परवान्याबाबत घेतलेला ठराव वैध आहे का, याची तपासणी करण्याचे पत्र गंगापूरच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले.
गटविकास अधिकाऱ्यांनी त्याच दिवशी (८ डिसेंबर) उलट टपाली हा अर्ज वैध असल्याचे तातडीने उत्पादन शुल्कच्या अधीक्षकांना कळवले, असा वेगवान तपशील याचिकेच्या पुष्ट्यार्थ जोडण्यात आलेल्या पत्रव्यवहारात नमूद आहे. याचिकाकर्ते बाजीराव सोनवणे यांनी तत्कालीन पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या भावजयी छाया भुमरे यांच्यासाठी सरकारी यंत्रणा कमालीची वेगवान होती, असा आरोप केला आहे.
छाया राजू भुमरे या खासदार संदीपान भुमरे यांच्या भावजय आहेत. पांढरओहळ प्रमाणेच फारोळा येथेही मद्य विक्री दुकान सुरू करण्यासाठी वेगवान अनागोंदी झाल्याचा तपशील कागदपत्रातून स्पष्ट झालेला आहे. त्या संदर्भाने दुसरीही एक याचिका दाखल केलेली आहे. दुसऱ्या याचिकेत तत्कालीन पालकमंत्री तथा खासदार संदीपान भुमरे यांच्या खासगी सहायकाच्या पत्नीच्या नावे असणाऱ्या फारोळा येथील मद्य परवान्याशी संबंधित तपशील आहे. या दोन्ही याचिका ॲड. सिद्धेश घोडके यांच्या मार्फत दाखल केल्या आहेत. १९ ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे. – बाजीराव सोनवणे, याचिकाकर्ते.