लसीकरणासाठी जनजागृती; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई

औरंगाबाद : मराठवाडय़ात करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून खाटा वाढविण्यासह पुन्हा नव्याने प्राणवायू प्रकल्पाचा आढावा घेण्याचे निर्देश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. औषधे, चादरी, बेडसीटसह कामावरून कमी केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांशी पुन्हा संपर्क करा, असेही सुचविण्यात आले आहे. पण नव्या लाटेची तयारी करताना लसीकरणाचे लेझीम सुरूच आहे. दोन पाऊल पुढे एक पाऊल मागे असे लसीकरण होत असल्याने आता विभागात दररोज दोन लाख लसमात्रा देणे आवश्यक झाले आहे. परिणामी दंड आणि प्रोत्साहन या दोन्ही पातळ्यांवर काम सुरू झाले आहे.

हिंगोली जिल्ह्य़ात नगरपालिकेने २ ते २४ डिसेंबरदरम्यान लसमात्रा घेणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीस लॉटरी ठेवण्यात आली आहे. एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रिज, मिक्सर आदी बक्षिसे जाहीर केली आहेत. दुसरीकडे दंडाचा दंडुकाही उगारला जात आहे. औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पेट्रोल पंप, खासगी बसचालक, किराणा दुकानदार, स्वस्त धान्य दुकानातून धान्य देताना लसीकरणाचे प्रमाणपत्र तपासावे तसेच या आस्थापनांमध्ये काम करणाऱ्यांकडे एकही मात्रा घेणारे कर्मचारी असतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. शहरातील एका पेट्रोलपंपावर कारवाईही करण्यात आली. अशा दंडात्मक कारवाईचा कित्ता आता मराठवाडय़ातील अन्य जिल्ह्य़ातही गिरविला जात आहे. खरे तर दंडात्मक कारवाई कायदेशीर नसली तरी लसीकरण वाढावे म्हणून त्याला कोणी फारसा विरोध केला नाही. औरंगाबाद जिल्ह्य़ात लसीकरणाचा टक्का वाढत असला तरी नांदेड, हिंगोली, बीड जिल्हे लसीकरणात मागे आहेत. मराठवाडय़ात १८ वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या एक कोटी ५६ लाखांहून अधिक आहे. त्यातील ६९.८३ टक्के जणांचे लसीकरण झाले आहे. पण पहिली मात्रा घेणाऱ्यांपैकी अर्ध्यापेक्षा नागरिकांनी दुसऱ्या मात्रेकडे पाठ फिरवली. मराठवाडय़ात केवळ ३१.२३ टक्के व्यक्तींचे लसीकरण पूर्ण झाले आहे. एका बाजूला तिसऱ्या लाटेची तयारी, विषाणूने बदललेले रूप लक्षात घेता लसीकरणाची गती वाढविण्यावर भर दिला जात असला तरी लसीकरणाची गती दोन पाऊल पुढे एक पाऊल मागे अशीच आहे. काही ठिकाणी २४ तास लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली. बाजारपेठेत गर्दीच्या ठिकाणीही लस उपलब्ध करून देण्यात आली तरी लस घेण्यास आणि दुसरी मात्रा घेण्यास नागरिक पुढाकार घेत नसल्याचे दिसून येत आहे.

आकडेवारी

१८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींची अंदाजित संख्या: एक कोटी ५६ लाख २६ हजार ३००.

दोन मात्रेसह लसीकरणाचे उद्दिष्ट : तीन कोटी १२ लाख ५२ हजार ६००.

आतापर्यंत लस घेतलेल्यांची संख्या (पहिला मात्रा) :

एक कोटी नऊ लाख १२ हजार ४८४. ( ५९.८३ टक्के)

लस घेतलेल्या व्यक्तींची संख्या (दुसरी मात्रा) :  ४८ लाख ८० हजार ३४१. ( ३१.२३ टक्के)

मराठवाडय़ात लसीकरणात

मागे असणारे जिल्हे :नांदेड, हिंगोली, बीड

दुसरी मात्रा घेण्यात कमी असणारे जिल्हे :नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद</p>