छत्रपती संभाजीनगर : लातूर येथे शुक्रवारी रात्री पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली. चाकूर, निलंगा आणि औसा तालुक्यात पावसाचा जोर वाढला. अनेक ग्रामीण रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे. पुन्हा पुलावरुन पाणी वाहू लागले आहे. ओसरु लागलेला पूर पुन्हा वाढला आहे.
औसा तालुका मौजे जवळगा पोमादेवी जवळगा ते संक्राळ जाणाऱ्या रस्त्याच्या पुलावर पाणी आल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. कव्हा जमालपूर रस्ताही तावरजा नदीवरील पुलावरून पाणी जात असल्यामुळे बंद झाला आहे. उजळंब ते रोहिना जाणाऱ्या छोट्या पुलावरून पाणी जात आहे.
रोहिना गाव ते अंबिका देवी मंदिर तालुका चाकुर जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावरुन पाणी वाहत असल्यामुळे सध्या वाहतूक बंद आहे. शेळगाव येथे तिरुनदी वरील पुलावरून पाणी वाहत आहे. घनसरगाव- रेणापुर पूल पाण्याखाली गेला आहे. माकणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील येणारा येवा लक्षात घेऊन निम्न तेरणा प्रकल्पाचे एकूण १२ दरवाजे उघडण्यात आले आहेत.
बीडचे वार्ताहर स्वानंद पाटील कळवतात की, माजलगाव – मांजरा धरणातून नदीपात्रात विसर्ग पुन्हा वाढविण्यात आला आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पुन्हा जोरदार पाऊस झाला. पाण्याचा प्रवाह पाहता गेल्या दोन दिवसापासून बंद असणारा विसर्ग पुन्हा सुरू करण्यात आला आहे.
माजलगाव धरणातून सिंदफणा नदी पात्रात धरणाचे ११ दरवाजे उघडत ४२००० प्रतिसेकद घनफूट वेगाने विसर्ग केला जात आहे. केज मधील धनेगाव येथील मांजरा धरणाचे ६ दरवाजे उघडत नदीपात्रात २७१६६ प्रतिसेकंद घनफूट वेगाने पाणी सोडले जात आहे. यामुळे सिंदफणा आणि मांजरा नदीकाठच्या गावांना पुन्हा पूर येण्याची शक्यता आहे.