छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने पडेगाव-मिटमिटा भागात ६० मीटर रस्त्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रत्येकी तीस मीटर अंतरातील अनधिकृत इमारती, अतिक्रमणे पाडण्याची कारवाई गुरुवारी करण्यात आली. मोजणीमध्ये काही घोळ असल्याचे लक्षात आल्यानंतर पुन्हा तपासून इमारतींवर हातोडा मारण्यात आला.शहर विकास आराखड्यात मुख्य रस्ते ६० मीटरचे दाखविण्यात आले आहेत. त्यानुसार महापालिकेने रस्ते मोकळे करण्याची मोहीम हाती घेतली. या मोहिमेला मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठाने देखील मनपाच्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार देत बांधकाम परवानगी नसलेली अनधिकृत बांधकामे पाडण्याचे आदेश देत कारवाईला बळ दिले. त्यामुळेच मनपाच्या अतिक्रमण विभागाने केंब्रीज शाळा ते एपीआय कॉर्नर, महानुभाव आश्रम ते नक्षत्रवाडी आणि रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाखालील अनधिकृत बांधण्यात आलेली दुकाने आणि अतिक्रमणे जमीनदोस्त केली.
आज गुरुवारी मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाचे संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली पडेगाव ते मिटमिट्यापर्यंत ६० मीटर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या अनधिकृत तीन ते चार मजली इमारती, व्यापारी संकुल, बांधकामे, पत्र्याचे शेड हटवले. चिनार गार्डन चौकासमोरील बार, रेस्टॉरंट, लॉज असलेल्या चार मजली इमारतीचे बांधकाम पाडण्यात आले. गुंठेवारी असतानाही या इमारतीचे बांधकाम पाडण्यात आले. इमारत मालकाने वस्तुस्थिती आणि कागदपत्रे दाखविल्यानंतर पथकाने पाडापाडी थांबवली. त्यापाठोपाठ लहान-लहान दुकाने हटविण्यात येऊन व्यावसायिक व रहिवासी असलेल्या तीन मजली इमारतीवर हातोडा मारण्यात आला.
पडेगावातील सोमेश्वर महादेव मंदिर कमानीजवळील तीन मजली इमारतीचा काही भाग पाडण्यात आला. यावेळी इमारत थोडीशी एका बाजूला झुकली होती. त्यामुळे रस्त्यावरील वाहूतक थांबवून ही कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्त प्रवीण पवार आणि अतिक्रमण हटाव पथकप्रमुख संतोष वाहुळे उभे होते.
भिंतीवरील रेषा पुसल्या
मालमत्ता वाचविण्यासाठी एक-दोन ठिकाणी मनपाने बुधवारी केलेल्या खुणा मिटवून दुसऱ्या ठिकाणी केल्याचा आरोप नागरिकांनी केला. पुन्हा मोजणी केल्यानंतर मालमत्तांवर हातोडा मारण्यात आला. स्मशानभूमीसमोरील राधाकृष्ण कॉम्प्लेक्सचे बांधकाम पाडताना अधिकाऱ्यांनी पुन्हा मोजणी केली.