छत्रपती संभाजीनगर : ‘संजय नोटावाले’, ‘रम्मीराव ढेकळे’, ‘योगेश डान्सबारवाले’ , ‘ गुलाबी महाजन’, ‘ अघोरी जादूवाले’ असे ‘ बनावनवी ’ चित्रपटातील कलाकार असून संवाद म्हणून ‘ कारवाई करू,’, ‘ हे सहन केले जाणार नाही’, हे या चित्रपटाचे संवाद आहेत , अशी तिरकस टीका करत शिवसेना (उद्धव ठाकरे ) पक्षाच्या वतीने शहरातील क्रांती चौक परिसरात राज्य सरकारच्या कलंकित मंत्र्यांच्या विरोधात साेमवारी आंदोलन करण्यात आले.

‘मला लाज वाटते ’ अशी घोषणा देत शिवसैनिकांनी सरकारला खिजवणाऱ्या घोषणा दिल्या. विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात शिवसैनिक सहभागी झाले.

कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्री राज्याच्या मंत्रीमंडळात आहेत. त्यांना तातडीने काढून टाकायला हवे अशी शिवसेनेची मागणी आहे. विधानसभेत मंत्री रम्मी खेळतात, एका मंत्र्याचा डान्सबारच आहे, एक मंत्री पैशासह सिगरेट ओढत बसतो, एक जण अघोरी जादूटोणा करत असल्याचे दिसते. हे सारे महाराष्ट्राला लाजणारे आहे. या मंत्र्यांची लाज आता वाटते आहे. प्रश्न विचारले किंवा अधिकची माहिती विचारली की, कारवाई केली जाईल. हे सहन केले जाणार नाही, असे संवाद ऐकू येतात. या सर्वास महाराष्ट्रातील जनता वैतागलेली असल्याने हे आंदोलन केले असल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले.

क्रांती चौकात एका व्यासपीठावर बसून शिवसैनिक आणि अंबादास दानवे तसेच चंद्रकांत खैरे यांनी ‘ आम्हाला या मंत्र्यांची लाज वाटते, ’ अशा आशयाच्या घोषणा दिल्या. या वेळी ‘ मला लाज वाटते ’ असे पथनाट्यही सादर करण्यात आले. शहरातील पाणी पुरवठ्याच्या विलंबावरुन ‘ लबाडानो पाणी द्या’ असे आंदोलन केल्यानंतर राज्यभर कलंकित मंत्र्याच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.