राष्ट्रीय सुरक्षा मंचच्यावतीने औरंगाबाद येथे बुधवारी नागरिकत्व  सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ क्रांती चौक येथून सकाळी ११ वाजता मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा सतीश पेट्रोल पंप, विवेकानंद महाविद्यालय, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, निराला बाजारमार्गे औरंगपुरा येथील महात्मा फुले पुतळा येथे पोहोचला.

या मोर्चात संघ परिवाराशी संबंधित संस्थांबरोबरच महानुभव पंथ, सकल जैन समाज अशा अनेक संस्थांच्या कार्यकर्त्यांंचा सहभाग होता. मोर्चामध्ये ‘ना विरोध-ना निषेध, ना जात-ना धर्म, आम्ही भारतीय’, ‘छात्र आंदोलन तो बहाना है, असली मकसद दंगा फैलाना है’, ‘देश को जलानेवाले एक हो सकते हैं, तो क्या देश को बचानेवाले एक नही हो सकते’, असे फलक घेऊन हजारो महिला, पुरुष सहभागी झाले होते. त्याचबरोबर तिरंगा ध्वज घेऊन भारतमाता की जय, वंदेमातरम्, जयश्रीराम अशा घोषणा देण्यात येत होत्या. या मोर्चात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक मधुकरराव जाधव, भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, डॉ. भागवत कराड सहभागी झाले होते. या वेळी पाकिस्तानातून औरंगाबाद शहरात १५ ते ३० वर्षांपूर्वी आलेले आणि वास्तव्यास असलेले सहा जण सहभागी झाले होते.   या मोर्चाचा समारोप औरंगपुरा येथील महात्मा फुले पुतळ्याजवळ झाला. या वेळी वकील आशिष जाधवर यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी माहिती दिली. तसेच विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या भाषणाने मोर्चाची सांगता झाली.