परभणी : माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांच्यासह त्यांचे चिरंजीव समशेर वरपूडकर, स्नूषा प्रेरणा वरपूडकर यांच्यासह त्यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांनी आज (मंगळवारी) भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पक्षप्रवेश केला. यावेळी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री अतुल सावे, जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर आदी उपस्थित होते.
कोणताही विचार न करता आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश करत असून कार्यकर्त्यांना बळ मिळावे या दृष्टिकोनातून हा प्रवेश असल्याचे यावेळी वरपूडकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले. आपण काँग्रेस पक्षाचे आमदार असताना रवींद्र चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते, त्यावेळी त्यांनी विकासकामासाठी सहकार्य केले याचा यावेळी वरपूडकर यांनी उल्लेख केला.
पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी भारतीय जनता पक्षाचे राजकारण हे सकारात्मक असून शेवटच्या माणसाला केंद्रबिंदू मानून राजकारण करण्याची या पक्षाची पद्धत आहे. वरपूडकर यांच्या प्रवेशानंतर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकत राहील. नेते ज्या पद्धतीने निर्णय घेतील त्यानुसार त्याची अंमलबजावणी जिल्ह्यात केली जाईल असे सांगितले.
यावेळी बोलताना बावनकुळे म्हणाले, वरपूडकरांच्या नेतृत्वात परभणी जिल्ह्यातून अनेक कार्यकर्ते प्रवेश करत असल्याने जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचा जनाधार नक्कीच वाढेल व वरपूडकरांच्या अनुभवाचा भाजपला फायदा होईल. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राजकारणात काम करताना विकासाच्या प्रक्रियेत शेवटच्या माणसाला कसे आणता येईल याचा विचार सर्वांनी मिळून करावा, असे आवाहन केले. भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही, असे यावेळी ते वरपूडकरांना म्हणाले.
यावेळी माजी आमदार रामराव वडकुते, भारतीय जनता पार्टीच्या उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर, महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, माजी जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, डॉ. केदार खटींग, विठ्ठलराव रबदडे आदी उपस्थित होते. यावेळी वरपूडकर यांच्या समवेत शिवाजीराव बेले, बापूराव ढगे, रंगनाथ भोसले, तुळशीराम सामाले, टी. एम. देशमुख, दिलीपराव देशमुख, माजी सभापती द्वारकाबाई कांबळे, श्रीनिवास जोगदंड, पंचायत समितीचे माजी सभापती तुकाराम वाघ, माजी सभापती बाळासाहेब रसाळ, सोनपेठ बाजार समितीचे माजी सभापती संतोष सावंत, माजी उपसभापती दिलीपराव देशमुख, परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान उपसभापती अजय चव्हाण, प्रमोदराव भोसले, रमेशराव देशमुख, घनश्याम कनके, काँग्रेसचे सोनपेठ तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण भोसले, पाथरी तालुकाध्यक्ष अनिल धोंडगे, मानवत तालुकाध्यक्ष बाबासाहेब आवचार, परभणी विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष श्रीधरराव देशमुख आदींनी यावेळी पक्षात प्रवेश केला.