"फडणवीसांनी शिंदे गटाचा पद्धतशीर गेम..." आमचे ४० भाऊ उपाशी असल्याचं म्हणत सुषमा अंधारेंची टोलेबाजी! | sushma andhare on eknath shinde group game by devendra fadnavis rmm 97 | Loksatta

“फडणवीसांनी शिंदे गटाचा पद्धतशीर गेम…” आमचे ४० भाऊ उपाशी असल्याचं म्हणत सुषमा अंधारेंची उपरोधिक टोलेबाजी!

“आमचे भाऊ ओवाळून टाकले असले तरी…” सुषमा अंधारेंची जोरदार टोलेबाजी!

“फडणवीसांनी शिंदे गटाचा पद्धतशीर गेम…” आमचे ४० भाऊ उपाशी असल्याचं म्हणत सुषमा अंधारेंची उपरोधिक टोलेबाजी!
संग्रहित फोटो

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे मागील काही दिवसांपासून विविध मतदारसंघात जाऊन ‘महाप्रबोधन यात्रे’चं आयोजन करत आहेत. महाप्रबोधन यात्रेतील सभांमधून सुषमा अंधारे सातत्याने शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीवर टीकास्र सोडत आहेत. दरम्यान, त्या शिंदे गटातील नेत्यांचा वारंवार ‘भाऊ’ असा उल्लेख करत आहेत. याबाबत प्रश्न विचारला असा सुषमा अंधारे यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे,

“आमचे भाऊ ओवाळून टाकले असले तरी ओवाळणी मागणं आपलं काम आहे” असा टोला सुषमा अंधारेंनी लगावला आहे. त्या औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवेही उपस्थित होते.

हेही वाचा- “राज्यपालांचं वय झालंय, आता त्यांना…” शिवरायांबद्दल केलेल्या विधानावरून वसंत मोरेंची खोचक टीका!

यावेळी शिंदे गटाला उद्देशून सुषमा अंधारे म्हणाल्या, “महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून मी त्यांच्या (शिंदे गट) सदसद्विवेकाला हात घालण्याचा प्रयत्न करते. ईडा पिडा टळू दे आणि भावाचं राज्य येऊ दे… असं मी म्हणते. पण माझ्या भावाचं राज्य आलंच नाही. भावाला राज्य आल्याचा केवळ भ्रम तयार करून दिला आहे. त्यांना केवळ पद दिलं आहे, पण अधिकार अजिबात दिले नाहीत. याउलट आपण खात्यांचा विचार केला तर लोकांचा थेट संबंध असलेली सर्व खाती शिंदे गटाकडे दिली आहेत.”

हेही वाचा- Photos: “…तर आम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहावी लागली असती” बंडखोरीबाबत गुलाबराव पाटलांचं मोठं विधान

“म्हणजे अलीकडे सात प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले आहेत. यावरून युवा वर्ग चिडला आणि त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली तर ते कुणाला प्रश्न विचारतील, ते सहाजिकच उदय सामंतांना प्रश्न विचारतील. शेतकऱ्यांचा प्रश्न उद्भवला तर ते कुणाला प्रश्न विचारतील? ते आमच्या अब्दुलभाईला विचारतील. याच्यात देवेंद्र फडणवीसांचं काहीही नुकसान होत नाही. फडणवीसांनी पद्धतशीर शिंदे गटाचा गेम करायचं ठरवलं आहे. सर्व मलिदेची खाती देवेंद्र फडणवीसांकडे आहेत. वित्त, जलसंधारण, जलसंपदा, गृह खातंही त्यांच्याकडे आहे. हे कमी होतं म्हणून की काय फडणवीसांनी सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रीपदं आणि उपमुख्यमंत्रीपदही आपल्याकडे घेतलं आहे. म्हणजे माझे चाळीस भाऊ उपाशी आणि एकटे देवेंद्र फडणवीस तुपाशी आहे. यामुळे मला भावांची काळजी वाटते” अशी उपरोधिक टीका सुषमा अंधारेंनी केली आहे.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-11-2022 at 15:37 IST
Next Story
औरंगाबाद: राज्यपाल कोश्यारींच्या विधानावरून नवा वाद