छत्रपती संभाजीनगर : एवढं मजबूत सरकार कधीच नव्हतं. तरीही विरोधी पक्ष नेते पदासाठी संख्याबळ, कायदे, नियम सांगितले जातात. जर कायदेच पाळायचे असतील तर राज्यात नेमण्यात आलेले दोन उपमुख्यमंत्री पदे संसदीय आहेत काय, असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेतेपदाचा प्रश्न हंबरडा मोर्चातून उपस्थित केला.या पदाला नाही म्हटले तरी अधिकार असतात. यंत्रणेला विचारता येते. पण हे करु द्यायचे नाही. ते दोन ‘ हाफ’ उपमुख्यमंत्री पदे संविधानाला धरुन आहेत काय, असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला.
विरोधी पक्ष नेते पद मिळाले नाही तरी काही बिघडत नाही. दिवाळीपर्यंत पॅकेजची अंमलबजावणी झाली नाही, हे तपासू. जे अधिकारी ऐकत नसतील, त्यांना आसूड दाखवा असे म्हणत ठाकरे यांनी राज्याच्या विरोधी पक्ष नेते पदाचा विषय चर्चेत आणला. शेतकऱ्यांच्या मोर्चात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येऊन गेले. त्यांची दोन -तीन भाषणे झाली म्हणे. पण एकाही ठिकाणीच्या भाषणात त्यांच्या शेतकऱ्यांचा उल्लेख होता का, ज्या महाराष्ट्रात आपण जातो आहोत त्या राज्याची परिस्थिती काय आहे, हे त्यांना माहिती नसते ?, त्यांच्याकडून आपण काय मागणार आणि आपण काय मागणार, असे ठाकरे म्हणाले. एका अटीवर पॅकेजचे समर्थन करायलाही तयार आहे. जर मनरेगातून साडेतीन लाख रुपयांपर्यंतचे काम केले जाणार असेल तर दिवाळीपूर्वी त्याच्या खात्यात एक लाख रुपये टाका. मग पुढचे पुढे पाहू, असेही ठाकरे म्हणाले.
जीवन उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला सुरुवात केली की त्यांना राजाकरण करू नको रे बाबा असे म्हणता. खरे चिकनाचा भाव विचारला असता तरी चालले असते. मृत कोंबडीसाठी १०० रुपये आणि गायीसाठी ३७ हजार रुपये. दुधाळ गायीची किंमत दीड लाख रुपये आहे. कर्जाचे पुनर्गठन नको तर कर्जमुक्ती हवी आहे. हे विचारण्याचा मला अधिकार आहे, कारण मी मुख्यमंत्री असताना कर्जमुक्ती केली होती, असे ठाकरे म्हणाले.
कर्जमुक्तीसाठी रस्त्यावर उतरू
कर्जमुक्ती केली नाही तर केवळ मराठवाडा नाही तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरू, असा इशारा देत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हंबरडा मोर्चात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टीकेचे केंद्रस्थानी ठेवले. पंतप्रधान मुंबईत येऊन गेले. पण त्यांच्या भाषणात एक शब्द तरी शेतकऱ्यांचा होता का ? , शेतकऱ्यांच्या वाटेवर ज्या सरकारने खिळे ठोकले, तारकुंपणे टाकली ते निवडणुका लागल्या की आश्वासने देतात, असे ते म्हणाले. हा हंबरडा मोर्चा नाही तर इशारा मोर्चा आहे. कर्जमुक्ती केली नाही तर केवळ मराठवाडा नाही तर महाराष्ट्रातील शेतकरी घेऊन रस्त्यावर उतरू, असेही ठाकरे म्हणाले.