छत्रपती संभाजीनगर : संपूर्ण कर्जमुक्तीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आता आक्रमक झाला असून सोमवारपासून (दि.५) ते ११ ऑक्टोबर दरम्यान विविध पातळ्यांवर आंदोलन ठरविण्यात आले असून ११ ऑक्टोबर रोजी विभागीय आयुक्तालयावर होणाऱ्या मार्चोचे नेतृत्व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करणार आहेत.

धाराशिव व लातूर जिल्ह्यात ठाकरे यांनी अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे हंबरडा मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी कळविले आहे.

मराठवाड्यातील पूरस्थितीमुळे शेतकरी हैराण झाला असून कर्जमुक्तीची मागणी जोर धरत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात या मागणीला अधिक टोकदारपणे पुढे नेण्यासाठी शिवसेना मैदानात उतरली आहे. या मोर्चाच्या तयारीसाठी ५ ते ७ ऑक्टोबर रोजी ग्रामसभा, गावभेटी व बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. ८ ऑक्टोबर रोजी प्रत्येक तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे व निदर्शने केली जाणार आहेत.

त्यानंतर हंबरडा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने जिल्ह्यात खिळखिळे झालेल्या संघटना बांधणीला शिवसेना ठाकरे गटा जोर देत असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यात छत्रपती संभाजीनगरचे नेतृत्व करणारे सात माजी महापौर शिंदे गटात गेले होते. ग्रामीण भागातील अनेक कार्यकर्तेही एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारत आहेत. मात्र, अतिवृष्टी आणि पूर यामुळे निर्माण झालेला रोष कर्जमुक्तीच्या मागणी पुढे रेटण्यास उपयोगी पडू शकत असल्याने मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे नेतृत्त्व स्वत: उद्धव ठाकरे करणार आहेत.