छत्रपती संभाजीनगर : परळी येथे मुख्यालय असलेल्या वैद्यनाथ अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या १७ संचालक मंडळाच्या जागांसाठी रविवारी १०८ केंद्रावर मतदान पार पडले. पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे, माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे, प्रज्ञाताई गोपीनाथराव मुंडे यांच्यासह आमदार धनंजय मुंडे आदींनी मतदानात सहभाग घेतला. १२ ऑगस्ट रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

बँकेच्या १७ पैकी चार जागा बिनविरोध आल्याने उर्वरित १३ जागांसाठी मतदान झाले असून बँकेचे ४३ हजार ९६२ हजार सदस्य मतदार आहेत. बीड जिल्ह्यात ६७ मतदान केंद्र आहेत. लातूर, धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालना, जळगाव, नाशिक, मुंबई, पिपरी चिंचवड, सोलापूर जिल्ह्यात हे बूथ आहेत.अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर सर्वसाधारण मतदार संघातून १२ जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. तर निवडणुकीत महिला मतदार संघातून डॉ. प्रीतम गोपीनाथ मुंडे, माधुरी योगेश मेनकुदळे, ओबीसी मतदार संघातून अनिल तांदळे तर अनुसूचित जाती मतदार संघातून विनोद जगतकर हे बिनविरोध आले आहेत.

समृत जाधव निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया होत आहे. राज्य निवडणूक प्राधिकरणाने या निवडणुकीसाठी ५०० पेक्षा जास्त कर्मचारी नियुक्त केले आहेत. वैद्यनाथ बँकेच्या निवडणूक मतदानासाठी परळी येथे वैद्यनाथ महाविद्यालयात १९ केंद्र, लक्ष्मीबाई महाविद्यालयात १० तर वैद्यनाथ कारखाना परिसरात ६ असे एकूण ३५ मतदान केंद्र आहेत. मतदानानंतर मतपेटीसाठी बीड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात स्ट्राँगरूम असून १२ ऑगस्ट रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.

दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी त्यांच्या राजकारणाला समाजकारणाचीही जोड देण्यासाठी म्हणून स्थापन केलेली पहिली संस्था म्हणजे वैद्यनाथ अर्बन बँक. परळीचे तत्कालीन नगराध्यक्ष अशोक सामत आदींना सोबत घेऊन बँकेची मुहूर्तमेढ रोवली. पुढे या बँकेची भव्य चार मजली इमारत साधारण ३० वर्षांपूर्वी उभी करून तिचे लोकार्पण तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या हस्ते केले होते. मुंडे तेव्हा राज्यात विरोधी पक्षनेते होते. एकाच हेलिकॉप्टरने नाईक व मुंडे परळीत उतरले होते. पुढे बँकेच्या शाखांचा राज्यभर विस्तार झाला. मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांच्याकडेच बँकेची सूत्रे आली.

पंकजा मुंडे व धनंजय मुंडे परस्परांविरोधात असताना बँकही पंकजा मुंडे यांच्या ताब्यातून जाते की काय अशी चर्चा व्हायची. परंतु अद्याप तरी पंकजा मुंडे यांनी बँकेवरची पकड कायम राखली आहे. सध्याच्या निवडणुकीत पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्यामध्ये “सामंजस्य राजकारण” सुरू असून, धनंजय मुंडे यांच्या चार समर्थकांना निवडणुकीत संधी देण्यात आली आहे. मुंडे भावंडांचे स्थानिक पातळीवरील विरोधक राजेभाऊ फड यांनी बँकेच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनल उभे करून काहीसे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला आहे.