स्वस्तात मस्त कारची निर्मिती करणे ही भारतीय वाहन बाजाराची सर्वात मोठी ओळख आहे. यातच देशातील दिग्गज आॅटो कंपनी मारुती सुझुकीच्या कार देशभरात खूप पसंत केल्या जातात. ग्राहक कार खरेदी करताना मारुतीच्या वाहनाना अधिक पसंत करताना दिसतात. देशात कार खरेदी करणाऱ्या सामान्य माणसाची पहिली पसंती मारुती सुझुकीची वाहने आहेत. याचे कारण कमी देखभाल, चांगले मायलेज आणि परवडणारी किंमत. यामुळेच भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत मारुतीची वाहने नेहमीच अव्वल स्थानावर राहतात.
आता मे महिना सुरू झाला असून मारुती सुझुकीची मोठी ऑर्डर बाकी आहे. एका अहवालानुसार, मारुती सुझुकीची सुमारे २,००,००० युनिट्सची ऑर्डर प्रलंबित आहे. या प्रलंबित ऑर्डरपैकी, कंपनीच्या सात-सीटर कार Ertiga चा महत्त्वपूर्ण वाटा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मारुती अर्टिगाच्या सुमारे ६०,००० ऑर्डर प्रलंबित आहेत. सीएनजी वाहनांची एकूण प्रलंबित ऑर्डर १,१०,००० युनिट्स आहे.
(हे ही वाचा : Tata Nexon चे धाबे दणाणले, महिंद्राची स्वस्त SUV कार ९ प्रकारात देशात दाखल, किंमत फक्त… )
कंपनीने आश्वासन दिले आहे की, मानेसर प्लांटमध्ये १,००,००० युनिट्सची अतिरिक्त क्षमता असलेली नवीन असेंब्ली लाईन मुख्यतः अर्टिगाची मागणी पूर्ण करण्यासाठी वापरली जाईल. २०२५ या आर्थिक वर्षात ६,००,००० CNG कार विकण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे, ज्यामध्ये Ertiga चाही मोठा वाटा असेल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, Ertiga CNG च्या मागणीत लक्षणीय वाढ होत आहे.
Ertiga CNG विक्री वाढली
कंपनीच्या मते, २०२४ मध्ये Ertiga ची एकूण विक्री १० लाख युनिट्सच्या पुढे जाईल. यामध्ये मोठ्या प्रमाणात सीएनजी प्रकार आहेत. २०१९ पर्यंत या MPV च्या ५ लाख युनिट्सची विक्री झाली होती. विशेष म्हणजे, CNG प्रकार फेब्रुवारी २०२० मध्ये लाँच करण्यात आला होता.
त्याच वर्षी अर्टिगाची विक्री १२ महिन्यांत ६ लाख युनिट्सवर पोहोचली होती. MPV ला पहिल्या ५ लाख युनिट्सच्या विक्रीचा आकडा गाठण्यासाठी ७ वर्षांहून अधिक काळ लागला, परंतु CNG व्हेरियंटच्या प्रचंड मागणीमुळे पुढील ५ लाख युनिट्सच्या विक्रीचा आकडा गाठण्यासाठी केवळ ४ वर्षे लागली.