भारत एनसीएपीमध्ये (Bharat-NCAP) टाटाच्या टाटा सफारी व हॅरियर या दोन एसयूव्ही गाड्यांची क्रॅश चाचणी करण्यात आली आहे. तसेच या चाचणीत या दोन्ही गाड्यांना फाइव्ह स्टार रेटिंग देण्यात आले आहे. टाटा कंपनीने या दोन्ही गाड्यांचे फेसलिफ्ट मॉडेल्स जरी केले होते; ज्यात त्यांची चाचणी घेण्यात आली. तसेच या दोन्ही वाहनांपैकी एक ग्राहकांच्या आवडत्या एसयूव्हींपैकी एक आहे.
टाटा मोटर्स कंपनीने दोन नवीन एसयूव्ही सफारी आणि हॅरियर फेसलिफ्ट सादर केल्या. महत्त्वाचे म्हणजे या दोन्ही एसयूव्ही गाड्या सुरक्षेच्या बाबतीत योग्य ठरल्या आहेत. कारण- या गाड्यांना ग्लोबल एनसीएपीनंतर आता भारत एनसीएपीमध्येही फाइव्ह स्टार रेटिंग मिळाले आहे. या दोन्ही एसयूव्ही देशातील सर्वांत सुरक्षित गाड्या ठरल्या आहेत. या दोन्ही एसयूव्ही गाड्यांना प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ३४ पैकी ३३.०५ गुण; तर मुलांच्या सुरक्षिततेसाठी ४९ पैकी ४५ गुण मिळाले आहेत. इतर गाड्यांच्या तुलनेत भारतीय टाटा कंपनीच्या या दोन्ही एसयूव्ही गाड्यांना सर्वधिक गुण मिळाले आहेत.
तसेच ही खास घोषणा करताना नितीन गडकरी म्हणाले, “मला आनंद होत आहे की, आज फाइव्ह स्टार रेटिंगसह प्रमाणित केलेली पहिली वाहने ‘टाटा मोटर्स’ची आहेत. भारतीय रस्त्यांवर सर्वांत सुरक्षित वाहने सादर करण्याचा त्यांचा वारसा समृद्ध केल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.”
तसेच टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे एम. डी. शैलेश चंद्र म्हणाले, “भारत-NCAP हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. कारण- ते ग्राहकांना विविध वाहनांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मूल्यांकन प्रदान करतात. त्यामुळे ग्राहक उत्तम निर्णय घेतात आणि देशातील सुरक्षित वाहनांसाठी ग्राहकांची पसंती आणखी वाढते. आम्ही वाहन सुरक्षा सुधारण्यासाठी काम करीत राहू“, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
टाटा सफारी आणि हॅरियरचे इंजिन :
या दोन्हीमध्ये समान २.०L, ४-सिलेंडर टर्बो डिझेल इंजिन असेल, जे १७०PS पॉवर आणि ३५०Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. इंजिनसोबत ६-स्पीड मॅन्युअल व ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिकचा पर्याय देण्यात आला आहे. मात्र, दोन्ही एसयूव्ही गाड्यांच्या मायलेजमध्ये थोडा फरक आहे.
टाटा सफारी आणि हॅरियरचे मायलेज :
नवीन Tata Safari फेसलिफ्ट मॅन्युअल गिअर बॉक्ससह १६.३० kmpl आणि ऑटोमॅटिक ट्रान्स्मिशनसह १४.५० kmpl चे मायलेज देऊ शकते. तर, Harrier मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअर बॉक्ससह अनुक्रमे १६.०८kmpl आणि १४.६०kmpl मायलेज देऊ शकते.