परीस खाडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निमगाव नावाचं एक गाव होतं. त्या गावात रमेश आणि सुरेश हे दोन मित्र राहत होते. त्यांच्यात कधीही भांडण होत नसे. त्या दोघांची शेजारी शेजारीच चाटची दुकानं होती. त्यांच्या दुकानातील चाट खायला  बाहेरच्या गावांतून लोक येत असत. रमेशचं पाणीपुरी आणि सुरेशचं भेलपुरीचं दुकान होतं. एक दिवस एक गरीब मुलगी रमेशच्या दुकानाजवळ आली. तिला खूप भूक लागली होती. तिनं रमेशकडे खायला मागितलं. रमेश तिला हटकत म्हणाला, ‘‘चल हट बाजूला, डोकं खराब करू नकोस.’’ ती मुलगी नाराज होऊन सुरेशच्या दुकानाजवळ गेली. सुरेशनं तिला खायला दिलं. तिने सुरेशच्या नकळत एक चंदेरी डबी ठेवली आणि ती मुलगी त्याचे आभार मानून निघून गेली. रात्र झाली. सुरेश घरी गेला. रात्री त्याच्या स्वप्नात एक परी आली. तिनं सांगितलं, ‘‘आज तू ज्या गरीब मुलीला खायला दिलं ती मीच होते. मी तुझी परीक्षा घेत होते. मी तुझ्या दुकानात एक चंदेरी डबी ठेवली आहे. त्यात एक जादूई मसाला आहे. तो मसाला कधीच संपत नाही. तू तो मसाला तुझ्या चाटमध्ये टाक. त्या मसाल्याच्या वासानं लोक तुझ्याकडचं चाट खायला येतील. मात्र एक लक्षात ठेव, तो मसाला चाटमध्ये घालताना तुला एक मंत्र म्हणायचा आहे, तो मंत्र जर तू म्हणाला नाहीस तर त्याचे परिणाम वाईट होतील.’’ इतकं बोलून परी त्याच्या स्वप्नातून निघून गेली.

सकाळी तो उठला आणि  स्वप्नाबद्दल विचार करू लागला. त्याचा काही विश्वास बसत नव्हता. तो दुकानात गेला. दुकानात गेल्यावर पाहतो तर काय, तिथे खरंच एक चंदेरी डबी होती. त्यानं ती खोलून पाहिली तर त्यात मसाला होता. त्याला स्वप्नातल्या परीचा विश्वास वाटला. त्याने तो मसाला चाटमध्ये घातला व परीनं सांगितलेला मंत्र म्हटला आणि काय आश्चर्य, त्या वासानं सगळे लोक सुरेशच्या दुकानात येऊ लागले आणि तो खमंग चाट खाऊ लागले. आज सुरेशची मोठी कमाई होऊ लागली हे पाहून रमेशला त्याचा मत्सर वाटू लागला. या गोष्टीचे रहस्य जाणण्याकरिता रमेश रात्री सुरेशच्या घराजवळ येऊन ऐकत होता. त्या वेळी सुरेश त्याच्या बायकोला सगळी हकीकत सांगत होता. रमेशनं सगळं ऐकलं आणि ती डबी चोरायचं ठरवलं. रात्री सुरेश झोपला असताना रमेशनं ती डबी चोरली व दुसऱ्या दिवशी आपल्या चाटमध्ये तो मसाला घातला. पण त्याला माहीत नव्हतं की, तो मसाला पदार्थात घालताना मंत्र म्हणायचा आहे. त्यामुळे त्या चाटच्या वासानं लोक चाट खायला आले व त्यांचं पोट दुखू लागलं. त्यांना विषबाधा झाली. लोकांनी पोलिसांकडे रमेशची तक्रार केली आणि रमेशला अटक झाली. इकडे सुरेशला हे कळेना की त्याची डबी कुठे गेली. रमेशला अटक झाल्याचं सुरेशला कळलं. त्याला खूप वाईट वाटलं. एक दिवस सुरेशच्या स्वप्नात पुन्हा ती परी आली. ती म्हणाली, ‘‘तुझी ती डबी रमेशनं चोरली आहे; पण त्यानं मंत्र म्हटला नाही, त्यामुळे लोकांना विषबाधा झाली आणि त्याला अटक झाली. ती डबी तुला परत हवी असेल तर ती रमेशसोबत वाटून घ्यावी लागेल. हे मलाही मान्य आहे की, रमेशने डबी चोरली आहे. त्याच्याकडून चूक झाली आहे; पण माणसांकडूनच चुका होतात, त्या दुरुस्त केल्या पाहिजेत आणि त्यांना क्षमा केली पाहिजे.’’

सकाळी सुरेश दुकानात गेला. त्याच दिवशी रमेशची सुटका झाली होती, कारण पोलिसांनी रमेशच्या दुकानाची चौकशी केली; पण त्यांना काहीही गैर आढळले नाही, कारण परीने ती डबी गायब केली होती. चौकशीअंती रमेशला सोडण्यात आले होते.

रमेशने झालेला प्रकार सुरेशला सांगितला आणि त्याची माफी मागितली. सुरेशनेही रमेशला मोठय़ा मनानं माफ केलं. आता रमेश व सुरेश परीनं सांगितलेला मंत्र म्हणूनच चाटमध्ये  मसाला घालतात; पण लोकांचा रमेशवरचा विश्वासच उडाला होता. त्यामुळे लोक रमेशकडे चाट खायला आलेच नाहीत. हे सुरेशलाही कळत होतं, एक दिवस सुरेशनं लोकांना रमेशकडचा चाट खाऊन दाखवला व  म्हणाला, ‘‘रमेशकडच्या चाटमध्ये काहीच खराबी नाही. त्याचे चाटही उत्तम आहे.’’ इतके बोलून सुरेश गप्प बसला. सुरेशवर लोकांचा विश्वास होता. लोकांनीही त्याचं ऐकलं आणि ते रमेशकडचा चाट खायला लागले. आता ते दोघे मित्र सुखात राहू लागले.

इयत्ता- सातवी, न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, बारागाव,  ता. सिन्नर, जि. नाशिक

lokrang@expressindia.com

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Friendship story for children story about friendship with moral lessons for kids zws
First published on: 07-05-2023 at 21:46 IST