जानेवारी महिना सुरू झाला की सोसायटीतील सभासदांना पिकनिकचे वेध लागत. यंदा सहकुटुंब सर्वानी नेरळला एका रिसॉर्टवर जाण्याचं ठरलं. ठीक ७ वाजता बस आली. मुलं भराभरा बसमध्ये चढली. मागची सगळी जागा मुलांनी आधी ठरल्याप्रमाणे भरून गेली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘मोठय़ा माणसांनी पुढे बसा!’’ सगळय़ांनी एकमताने सांगितलं. बघता बघता बसमध्ये सगळे बसलेसुद्धा! ‘गणपती बाप्पा मोरया’ असे म्हणून बस निघाली. बसमध्ये गप्पा, गाणी, भेंडय़ा अगदी सगळय़ांना ऊत आला होता. सँडविचेस, चकल्या, वडय़ा, चॉकलेट्स एकामागून एक फस्त होत होतं. इतक्यात कुणीतरी तिळाचे लाडू बाहेर काढले.

‘‘ए, काय मस्त झालेत तिळाचे लाडू!’’  ‘‘खूप खावेसे वाटतात नाही?’’ ‘‘आपण नेहमी का करीत नाही असले लाडू? जानेवारी महिन्यातच का?’’ ‘‘अगं, हे संक्रांतीलाच करतात!’’  ‘‘तिळगूळ घ्या आणि गोड बोला!’’अशी बोलणी चालू असताना तिळाचे लाडू संपलेही! ‘‘संक्रांत जानेवारीच्या १४ तारखेलाच का येते?’’ असे प्रश्नही मुलं एकामागोमाग विचारायला लागली. तेव्हा मुलांची उत्सुकता पाहून ‘‘कामत आजी नाश्ता-चहा झाल्यावर आपल्याला संक्रांतीविषयी माहिती-सांगतील’’ असं पिकनिकच्या संयोजिका भारतीताईंनी सांगूनही टाकलं.

आणखी वाचा – आरोग्यदायी आहार : तिळगूळ पोळी

नाश्ता-चहा झाला. सर्वजण नेरळच्या रिसॉर्टवर इकडे-तिकडे फिरत होते. इतक्यात मुलांनी गोल आकारात खुच्र्या लावून समोर एक खुर्ची ठेवून सगळय़ांना बोलावलं आणि ‘‘कामत आजी चला, सांगा ना संक्रांत म्हणजे काय? ती १४ जानेवारीलाच का असते?’’ असा धोशा लावला.
‘‘आज कामत आजी सगळय़ांना संक्रांतीविषयी वैज्ञानिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि पर्यावरणविषयक महत्त्व सांगतील, तुमचे प्रश्न, शंका एकेकाने त्यांना विचारा!’’ भारतीताईंनी सांगून टाकलं.

कामत आजी समोर बसल्या आणि बोलू लागल्या- ‘‘बाळांनो, आपण उत्तर गोलार्धात राहतो. सूर्याने २१ डिसेंबरला सायन मकर राशीत प्रवेश केला की उत्तरायणारंभ होतो. दिनमान वाढू लागतो. पूर्वी विद्युत दिवे नव्हते. माणसांना सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच उजेडात कामे करता येत. त्यामुळे दिनमान वाढण्याला खूप महत्त्व आहे. तुम्हाला माहीत आहे की, २१ डिसेंबरला आपल्या इथं मोठी रात्र व दिवस  लहान असतो. २१ मार्च आणि २३ सप्टेंबर या दिवशी दिनमान – रात्रिमान समान असतं आणि २१ जूनला सर्वात मोठे दिनमान आणि लहान रात्रिमान असते. आपल्या इथं निरयन पंचांगे वापरली जातात. त्यानुसार १४ जानेवारीला सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून आपण १४ जानेवारीला मकरसंक्रांती साजरी करतो.
नेहमी संक्रांती १४ जानेवारीलाच येते असे नाही. मकरसंक्रांतीचा दिवस दर चारशे वर्षांनी तीन दिवस आणि एकशेसत्तावन वर्षांनी एक दिवस पुढे जातो. सन २०० मध्ये मकर संक्रांती २२ डिसेंबरला आली होती. सन १८९९ मध्ये मकरसंक्रांती १३ जानेवारीला आली होती. १९७२ पासून २०८५ पर्यंत मकरसंक्रांती कधी १४ जानेवारीला, तर कधी १५ जानेवारीला येत आहे. सन २१०० पासून मकरसंक्रांती १६ जानेवारीला येईल आणि बाळांनो, सन ३२४६ मध्ये मकरसंक्रांती चक्क १ फेब्रुवारीला येणार आहे.’’

आणखी वाचा – Bornahan: लहान मुलांचे बोरन्हाण का केले जाते? जाणून घ्या यामागचे कारण

‘‘आजी, मग तिळाचेच लाडू का करतात?’’

‘‘ऋतूप्रमाणे आहारात बदल केला की आरोग्य चांगले राहते. थंडीमध्ये शरीराला स्निग्ध पदार्थाची खूप जरुरी असते. तीळ आणि गूळ हे थंडीमध्ये शरीराला खूप चांगले असतात. तीळ हे आयुर्वेदिक औषधी आहेत. थंडीमध्ये आपली त्वचा कोरडी पडते. तिळाचे तेल लावले तर त्वचा चांगली राहते.
आपले सर्व सण हे सामाजिक, सांस्कृतिकदृष्टय़ा खूप महत्त्वाचे असतात. सर्वानी एकत्र प्रेमाने राहावे हा त्यामागचा हेतू असतो. वर्षभरात कुणाशी वादविवाद, भांडणे झाली असतील. अबोला धरला गेला असेल तर मकरसंक्रांतीच्या दिवशी एकमेकांना तिळगूळ देऊन संबंध सुधारले जातात. तीळ, गूळ, शेंगदाणे, खोबरे घालून तयार केलेले लाडू मस्त लागतात ना? तुम्हाला आवडतात ना?’’

‘‘हो! हो! तिळगूळ घ्या आणि गोड बोला!’’ मुले जोरात ओरडली.

‘‘आजी, पण संक्रांतीला काळे कपडे का घालतात?’’ छोटय़ा अर्चनानं प्रश्न विचारला.

‘‘मकरसंक्रांती ही थंडीत येते. काळा रंग हा उष्णता शोषून घेतो. शरीर उबदार ठेवतो. म्हणून मकरसंक्रांतीच्या निमित्ताने काळय़ा रंगाचे कपडे घालतात.

‘‘आजी, माझी आई हळदीकुंकू समारंभ करते. तिच्या सर्व मैत्रिणींना बोलावते. ते का?’’- छोटय़ा अनिकेतचा प्रश्न.

‘‘सर्व जणी हळदीकुंकूच्या निमित्ताने एकत्र येतात. एकमेकींना भेटवस्तू देतात. खूप मजा येते त्या दिवशी! तसेच संक्रांतीच्या निमित्ताने गरिबांना काही वस्तू दान देऊन मदत करण्याचीही पद्धत आहे.’’

आणखी वाचा – काच असलेला मांजा नका वापरू, जखमी करू नका पाखरू

‘‘आम्ही, मकरसंक्रांतीला खूप पतंग उडवतो.’’- छोटा अभय म्हणाला.

‘‘दिनमान वाढत गेल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ आपण पतंगाने सूर्याचे स्वागत करतो. परंतु बाळांनो, एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. काही मुले पतंगाला धारदार मांजा वापरतात. त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी आकाशात उडणारे अनेक पक्षी घायाळ होतात. मृत्युमुखी पडतात. आकाश हे पक्ष्यांचेही आहे त्यामुळे पतंग उडविण्यापेक्षा इतर अनेक खेळ खेळून आनंद घेता येईल ना? आपण आनंद घेत असताना पक्ष्यांना का मारायचे?’’

आजींची ही गोष्ट सर्व मुलांना पटली. मुलांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली होती. तेवढय़ात भारतीताईंनी आणखी तिळगुळाचे लाडू मुलांना वाटले. मुलांनी मोठय़ा आवाजात गजर केला- ‘‘तिळगूळ घ्या.. गोड बोला!’’

आणखी वाचा – तिळगुळ घ्या गोडगोड बोला… आपल्या प्रियजनांना द्या मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…

भारतीताई म्हणाल्या- ‘‘चला, मुलांनो आता भूक लागली असेल. तिळाची भाकरी, वांग्याचे भरीत आणि गुळाची पोळी तुमची वाट पाहत आहेत. चला, लवकर चला जेवायला!’’ सर्व मुलं आनंदात जेवणाच्या खोलीत पळत गेली.

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tilgul ghya god bola
First published on: 19-01-2014 at 01:03 IST