सौरऊर्जेवर चालणारे विमान भारताने तयार केले नसले, तरीही या विमानाने भारताला दर्शन दिले आहे. मुबलक प्रमाणात सौरऊर्जा उपलब्ध असतानाही हे विमान भारतात का तयार होऊ नये, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला असताना; आपण मात्र अजूनही सौरऊर्जेचा वापर पाणी गरम करणे आणि रस्त्यावरचे दिवे उजळवण्यापुरतेच करतो आहे. तुम्ही-आम्ही सामान्य माणसं सौरऊर्जेतून आणखी काही करता येईल याच्या वाटय़ालाही जाणार नाही. पण अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे डोके अशा वेळी नाही वळवळले तर नवलच! चंद्रपूरच्या अविनाश जाधव या मुलानेदेखील जैववैद्यकशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. (या शाखेकडे फारसे कुणी वळत नाही, पण तो वळला.) मात्र, अभियांत्रिकी क्षेत्रात काहीतरी वेगळे करून पाहण्याची वृत्ती ज्या फार थोडय़ा विद्यार्थ्यांमध्ये असते तीच याच्यातसुद्धा होती. सुरुवातीला जैववैद्यकशास्त्रात विविध प्रयोग करून झाल्यानंतर तो सौरऊर्जेकडे वळला आणि पाहता पाहता त्याने सौरऊर्जेवरील उपकरणांचा उद्योग उभारला. त्याने तयार केलेले अवघ्या १५ हजार रुपयातील ‘सौरकुंपण’ संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले आहे.

अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन हजारो मुले आजही नोकरीच्या शोधात आहेत, तरीही अभियांत्रिकीकडे वळणाऱ्या मुलांची रांग मोठी आहे. चंद्रपूरसारख्या शहरातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातल्या या युवकाने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आणि तेसुद्धा ‘जैववैद्यकशास्त्र’ या विषयात! यानंतर तो नोकरीकडे वळला नाही. काहीतरी वेगळे करण्याचा विचार त्याच्या मनात घोळत होता. त्याला व्यवसाय करायचा होता, पण मध्यमवर्गीयांचा कल नोकरीकडे असल्याने आईवडिलांचा तगादा त्याने नोकरी करावी असाच होता. व्यवसायावर उच्चवर्गीयांचीच मक्तेदारी हे त्याच्या मनावर कुटुंबियांकडून बिंबवण्यात आले होते. तरीही त्याला आपल्या शिक्षणाचा उपयोग व्यवसायात करायचा होता. आईचे संस्कार आणि कष्टाची तयारी अशा दोन गोष्टी सोबत घेऊन तो नागपूरला रवाना झाला. नव्या नवलाईचे नऊ  दिवस संपले आणि काटय़ांवरची त्याची कसरत सुरू झाली. छोटीमोठी कामं करून एक वेळचे पोट भरत होते, पण ते करण्यासाठी अविनाश नागपुरात आला नव्हता. दरम्यान, एका रुग्णालयात लागणारी उपकरणे तयार करणाऱ्या एका वितरकाकडे त्याला नोकरी मिळाली आणि स्वप्नपूर्तीच्या दिशेने जाणारा मार्ग गवसला. व्यावसायिक नसले तरी तांत्रिक ज्ञानाने तो समृद्ध होता आणि जगावेगळे काहीतरी करून दाखवण्याची जिद्द होती. रुग्णाला शस्त्रक्रियेपूर्वी बेशुद्ध करणारे एक अनोखे ‘अ‍ॅनेस्थेशिया उपकरण’ त्याने तयार केले. एका सुटकेसमध्ये मावेल असे हे उपकरण घेऊन त्याने अनेक इस्पितळांच्या वाऱ्या केल्या, पण नवख्या मुलावर विश्वास ठेवणार कोण? उद्या रुग्णाला काही झाले तर? असे म्हणून त्याला बाहेरची वाट दाखवली गेली. शेवटी परिचयातल्या डॉ. आरती केळकर यांनी अविनाशवर विश्वास टाकला. आईने दिलेले दहा हजार आणि नोकरीतून जमवलेले वीस हजार अशा तीस हजार रुपयांच्या भांडवलातून त्याने रुग्णालयातील यंत्रसामग्रीचा व्यवसाय सुरू केला. त्यातच त्याने बी.टेकची पदवीही घेतली. ‘अ‍ॅनेस्थेशिया उपकरणा’चे पाच वेगवेगळे मॉडेल्स त्याने तयार केले. रुग्णांना जीवनदान देणारे ‘अ‍ॅम्बुलन्स व्हेन्टिलेटर’ विकसित केले. त्याच्या कारखान्यात तयार झालेली रुग्णालयातील विविध उपकरणे भारतातच नव्हे तर नेपाळ, केनिया, पाकिस्तान या देशांतील रुग्णांना जीवनदान देण्याचे कार्य करत आहेत. परदेशातून लाखो रुपये खर्चून आयात केलेल्या उपकरणांपेक्षा, अविनाशने तयार केलेली उपकरणं कमी किमतीत आणि दर्जेदार असल्याने त्यांना चांगली मागणी आहे. युक्रेनच्या वैद्यकीय क्षेत्रातील एका संशोधन आणि विकास कंपनीने त्याच्या उपकरणांची विशेष दखल घेऊन त्याला संशोधनासाठी आमंत्रित केले होते, तेथेही तो जाऊन आला. जैववैद्यकशास्त्र, अभियांत्रिकीनंतर आणि त्याच्याशी संबंधित व्यवसायात स्थिरावल्यानंतर खरे तर आरामात खोऱ्याने पैसा कमावता आला असता, पण यादरम्यान त्याने बोर अभयारण्याजवळ शेती घेतली आणि त्याची वाटचाल पुन्हा एकदा वेगळ्या दिशेने सुरू झाली.

Xiaomi Company 14 Series in India launch on March seven Five things about the phone You Must Know Before Buy
Xiaomi चा स्मार्टफोन लवकरच भारतात होणार लाँच; खरेदीपूर्वी ‘या’ पाच गोष्टी जाणून घ्या…
Tata Punch Car
ऐकलं का…टाटाची ‘ही’ सुरक्षित कार १ लाखाच्या डाऊन पेमेंटवर खरेदी करा; किती भरावा लागेल EMI?  
Indian driving license
भारतीय ड्रायव्हिंग लायसन्ससह तुम्ही ‘या’ ९ देशांमध्ये बिनधास्त वाहन चालवू शकता!
gujarat drug bust indian navy seizes 3300 kg of drugs in Gujarat
गुजरातमध्ये ३,३०० कोटींच्या अमली पदार्थाचा साठा जप्त; पाच विदेशी नागरिकांना अटक

जंगल आणि गाव यांच्यातले कमी होणारे अंतर, परिणामी वन्यप्राण्यांमुळे जंगलालगतच्या शेतीचे होणारे नुकसान आणि त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्षांचा उंचावणारा आलेख.. ही परिस्थिती भारतात जवळपास सर्वच ठिकाणी सारखी आहे. तृणभक्षी प्राण्यांमुळे शेतीपिकांचे नुकसान आणि या तृणभक्षी प्राण्यांच्या मागावर असलेल्या वाघ, बिबटय़ाच्या दहशतीला शेतकरी सामोरे जात आहेत, हे त्याच्या लक्षात आले. शेतकरी ७५ टक्केशेतपीक केवळ या वन्यप्राण्यांमुळे गमावतात. त्यावर पर्याय म्हणून शेतकरी विद्युत प्रवाहाचे कुंपण शेतात घालतात. परिणामी वन्यप्राण्यांचा मृत्यू.. मग वनखात्याचा रोष ओढवून घेतात. ही सगळी परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात होती. शेतकऱ्यांच्या पर्यायाने या वन्यप्राण्यांच्या मृत्यूबरोबरच शेतकऱ्याच्याही जिवाला धोका असल्याचे लक्षात येताच अविनाशने त्यावर सौरकुंपणाचा पर्याय शोधला. राज्य आणि केंद्राच्या वनखात्याने हा सल्ला शेतकऱ्यांना दिला होता, पण तीन आणि चार लाख रुपयांचा हा पर्याय दुष्काळाच्या गर्तेतील शेतकरी स्वीकारणार कसा? जैववैद्यकशास्त्रातील अभियांत्रिकी पदवीचे डोके अविनाशने येथेही चालविले. सौरऊर्जेविषयीचे आकर्षण त्याला आधीपासूनच होते. शेती घेतल्यापासून आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या या समस्या जाणल्यानंतर काहीतरी वेगळे करून दाखवण्याचा त्याच्यातला धडपडय़ा अविनाश जागा जाला. ४५ अंश सेल्सिअस तापमानात राबणाऱ्या शेतकऱ्यांची वन्यप्राण्यांच्या त्रासातून सुटका करण्यासाठी सौरकुंपणाची माहिती गोळा करणे त्याने सुरू केले. तब्बल दोन वर्षांनंतर त्याच्या या संशोधनाला यश आले आणि चार लाखातले सौरकुंपण अवघ्या १५ हजारांत तयार केले. स्वत:च्याच शेतावर त्याने आधी प्रयोग केला आणि तो यशस्वी ठरला. बॅटरीवर चालणाऱ्या त्याच्या या सौरकुंपणामुळे वन्यप्राण्याचा मृत्यू होत नाही, तर या यंत्रणेतून वन्यप्राण्याला हलकासा झटका बसतो आणि वन्यप्राणी पुन्हा त्या शेताकडे येत नाहीत. त्याच्या या यंत्रणेचा विशेष म्हणजे, या कुंपणाजवळ गेल्यानंतर आपोआप सायरन वाजतो आणि शेतकऱ्याला या ठिकाणी वन्यप्राणी असल्याची माहिती कळते. ही यंत्रणा रिमोटवरूनच नव्हे तर भ्रमणध्वनीवरूनसुद्धा हाताळता येते. विशेष म्हणजे जंगलात लावलेल्या ‘कॅमेरा ट्रॅप’लासुद्धा ही यंत्रणा जोडता येते. त्यामुळे कॅमेऱ्यासमोरून वन्यप्राणी किंवा शिकारी गेला तरीही नियंत्रण खोलीत सायरन वाजतो आणि कॅमेऱ्यात ट्रॅप झालेला तो वन्यप्राणी किंवा शिकारीचे छायाचित्र त्या नियंत्रण खोलीतील संगणकावर दिसते. त्यामुळे शिकाऱ्याने कॅमेरा तोडला तरीही तत्पूर्वीच त्याचे छायाचित्र वनखात्याजवळ पोहोचलेले असते. अविनाशच्या या संशोधनामुळे चार लाख रुपयांच्या सौरकुंपणापासून वंचित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या चार वर्षांत साडेचार हजार शेतकऱ्यांपर्यंत त्याची ही यंत्रणा पोहोचली आहे. महाराष्ट्रच नव्हे तर उत्तरांचल, उत्तराखंड, झारखंड, मध्यप्रदेश, हरियाणा, बंगलोर अशा अनेक शेतकऱ्यांनी अविनाशच्या यंत्रणेला पसंती दिली आहे. विशेष म्हणजे वन्यप्राण्यांमुळे त्रस्त अनेक शेतकऱ्यांनी शेती सोडून इतरांच्या शेतावर राबणे सुरू केले. यामुळे विदर्भातील सुमारे ६ हजार ७८० हेक्टर शेतजमीन पडीक होती, पण अविनाशच्या सौर कुंपणाने या सर्व शेतकऱ्यांनी पुन्हा पीक घेण्यास सुरुवात केली आहे. वनखात्यानेही ७५ टक्के सबसिडीवर त्याच्या या यंत्रणेचा स्वीकार केला आहे. ‘अ‍ॅग्रो इंजिनीअरिंग इक्विपमेंट’ असा मोठा उद्योग व्यवसाय अविनाशने नागपुरातील अयोध्यानगरात उभारला आहे. सौरऊर्जेच्या वापराची सुरुवात शेतीपासून केल्यानंतर शिलाई मशीन, कापूस वेचण्याचे यंत्र, पिकांवर फवारणी करण्याचे यंत्र, मिक्सर, छोटा रेफ्रिजरेटर, चहाची किटली अशा अनेक वस्तू त्याने आता सौरऊर्जेवर कार्यान्वित करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे अविनाशच्या घरातील सर्व उपकरणे सौरऊर्जेवरच आधारलेली आहेत. सुरुवातीला ज्या अ‍ॅग्रोव्हिजनमध्ये अविनाश जाधवला त्याचा स्टॉल लावण्यासाठी जागा दिली जात नव्हती आता त्याचाच छोटाश्या कोपऱ्यात असलेला स्टॉल शेतकऱ्यांची सर्वाधिक गर्दी खेचत आहे. त्याच्या या संपूर्ण यंत्रणेला आयएसओ मानांकन मिळाले आहे. मुंबई शहरात वसई येथेही त्याच्या उद्योगाचे कार्यालय असून, संपूर्ण भारतात त्याने वितरक नेमले आहेत. सौरऊर्जेचा कोणताही अभ्यासक्रम नाही आणि त्याचा अभ्यास केला तर बेरोजगारांना रोजगार मिळू शकतो, हे लक्षात घेऊनच शेतकऱ्यांच्या होतकरूमुलांसाठी आणि बेरोजगारांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून सौरऊर्जेचा अभ्यासक्रम सुरू करण्याच्या प्रयत्नात तो आहे. त्यासाठी जागाही शोधली आहे. जैववैद्यकशास्त्रातील अभियांत्रिकी पदवी, बी. टेक, एमबीए अशा मोठमोठय़ा पदव्या त्याच्या नावामागे आहेत. सौरऊर्जेतील त्याचे संशोधन आणि त्यावर आधारित त्याचा लक्षावधीचा उद्योग विस्तारत असतानाच अविनाश जाधव नामक या युवकाचे पाय मात्र अजूनही जमिनीवरच आहेत.

राखी चव्हाण/ rakhi.chavhan@expressindia.com

दिनेश गुणे / dinesh.gune@expressindia.com