News Flash

BLOG: अंत्यविधीचे दिग्दर्शक!

गावात कुणीही गतप्राण झालं की नातेवाईक नंतर आठवतात, पहिला निरोप जातो तात्यांना!

प्रातिनिधिक छायाचित्र

– योगेश मेहेंदळे

आपण कुणाला गिफ्ट वगैरे देतो ते कसं छान रंगीत पेपरात बांधून नीट पॅक करून देतो. तसंच मृतदेहाला पण छान सजवून, चांगले चुंगले कपडे घालून पाठवायला हवं. देवाकडे पाठवत असणारी ती एक अमूल्य गोष्टच असते. तिची घाई-घाईत बोळवण नाही करता कामा, तर विवाह करून मुलीला ज्या समारंभपूर्वक पाठवतो नवऱ्याच्या घरी, तसा केला पाहिजे अंत्यविधी! हे माझं नाही तात्यांचं विचारधन… गावात कुणीही गतप्राण झालं की घरच्यांना अत्यंत जवळचे पण लांब राहणारे नातेवाईक नंतर आठवतात. पहिला निरोप जातो तात्यांना. आणि अग्निशमन दलाचे अधिकारी लेव्हल थ्रीचा कॉल आल्यावर ज्या तातडीनं रवाना होतात त्याच त्वरेनं तात्या कामाला लागतात. एकदा का घटनास्थळी तात्या पोचले की मग त्यांचा असा काही संचार सुरू होतो की त्या घरातल्या माणसाला क्षणभर प्रश्न पडावा आपण आपल्या घरात आहोत की तात्यांच्या?

तात्यांचं वय असेल सत्तरीच्या आसपास. गुडघेदुखीनं त्रस्त असलेले तात्या कुणी गेल्याचं कळलं की एकदम चाळिशीत आल्यासारखे वाटतात. तात्यांच्या या छंद म्हणता येईल अशा समाजकार्याचा धसका इतक्या जणांनी घेतलाय, की तात्या हॉस्पिटलमध्ये कुणाला बघायला गेले की नातेवाईकांच्या पोटात भीतीचा गोळा येतो. ते तब्येत बघायला आलेत की आपल्या कामाला कधी सुरूवात करायचीय याचा अंदाज घ्यायला आलेत हेच कळत नाही. एकदा तर तात्यांना बघून सगळीकडे नळ्या लावलेला पेशंट चक्क उठून बसला नी मी बरा आहे, लवकरच घरी आपल्या पायांनी जाईन वगैरे सांगायला लागला. तात्यांचा दराराच तसा आहे.

साधारणपणे कुणी आपल्याला लग्नाला बोलावलं नाही; वाढदिवसाची पार्टी देताना बाकी सगळ्यांना बोलावलं, आणि फक्त आपल्यालाच बोलावलं नाही की चिडायसा होतं. आपलं काही अडत नाही अशा थाटात आपण सांगतो की जा मी काही भिकारी नाही, नाही बोलावलं तर नाही, गेला खड्ड्यात वगैरे वगैरे… खरंतर ते न बोलावणं चांगलंच झोंबलेलं असतं; पण ते दाखवायचं कसं म्हणून मग आमचं काही अडत नाही वगैरे येतं. तात्या या बाबतीत वेगळंच प्रकरण आहे. लग्न, मुंजी, वाढदिवस म्हणजे वायफळ खर्च असं त्यांचं स्पष्ट मत. आणि निमंत्रणपत्रिका हातात पडल्या पडल्या त्यांचा पहिला प्रश्न असतो किती रूपयाची आहे ही पत्रिका? ती स्टायलिश नी महागडी आहे हे कळलं की कचऱ्याच्या कुंडीत फेकायच्या गोष्टीसाठी इतका खर्च कशाला हा प्रश्न लगेच येतोच! महागड्या हॉलमध्ये पाच-सातशे जणांना बोलावून थाटात लग्न केलेलं असलं की, त्यापेक्षा मुलीच्या नावाने बँकेत पैसे ठेवले असतेस तर त्याचा काही उपयोग तरी तिला झाला असता हे वाक्य हमखास ठरलेलं! त्यामुळे लांबचे नातेवाईक तात्यांना शक्यतो बोलवतंच नाहीत, आणि त्याचं तात्यांना पण काही वाटत नाही… बरं झालं नाही बोलावलं ते, आहेराचे पैसे वाचले ही उत्कट प्रतिक्रिया… पण त्यांना मयताची बातमी द्यायला कुणी विसरलं की मात्र त्यांच्या अंगाचा तिळपापड होतो. एकदा शेजारच्या इमारतीतले त्यांच्यापेक्षा १०-१५ वर्षांनी मोठे असलेले मुरबाडकर काका वारले. बातमी सांगायला आलेला नेमका तात्यांच्या घरी डोकवायला विसरला. ज्यावेळी तिरडी उचलली गेली तेव्हाच तात्यांना समजलं… त्यानंतर तात्यांनी जो काय हंगामा केलाय, की काही क्षण असं वाटलं की मुरबाडकर काका तिरडीवर उठून बसतील नी म्हणतील अरे बाबा आहे मी जिवंत… सगळ्यांनी अगदी मुरबाडकरांच्या ५५ वर्षांच्या मुलानं त्यांची माफी मागितल्यावर कुठे तात्या जरा शांत झाले. तरी परतताना, मी मेल्यावर तुम्हाला निरोप नाही आला तर कळेल कसं वाटतं ते! हे सांगायला विसरले नाहीत. गर्दीतल्या एका आचरट पोरानं आम्हाला तुमच्यासारखी हौस नाही, नाही कळवलंत तरी चालेल असा टोमणा मारलाच… नशीब तो तात्यांच्या कानावर पडला नाही.

मयताचा सीन कुणाच्याही घरी घडो, डायरेक्टर तात्या हे ठरलेलंच. म्हणजे ते तसं कुणी त्यांना नेमून दिलेलं काम नव्हे. जसं चौकात ट्रॅफिक जाम झाल्यावर काही जणांना आतून उबळ येते आणि ते गाड्या मागे पुढे करून रस्ता मोकळा करतात हा त्यातलाच प्रकार. काहीजणं जन्मालाच विशिष्ट कारणांसाठी येतात, एरवी त्यांच्या काम-धंद्याविषयी कुणाला फारशी माहिती नसून तात्या म्हटलं की जाणकार लोक तिरडीची खूण करून पोचपावती देतात. मयताला व्यवस्थित आंघोळ घालणं, चांगले त्याच्या आवडीचे कपडे घालणं, तिरडी अगदी शास्त्रात सांगितल्याप्रमाणं बांधणं आणि स्मशान कितीही लांब असो आणि काळ-वेळ कुठलीही असो खांद्यावरूनच अंत्ययात्रा नेणं हा त्यांचा आग्रहच असतो… शववाहिनी, अँब्युलन्स वगैरे प्रकार त्यांच्यामते लाज झाकण्यासाठी असतात. त्यांची उपयुक्तता वगैरे त्यांच्यालेखीही नसते. गेटपर्यंत तिरडी खांद्यावर नेणं मग गाडीत ठेवणं याला ते बॉलीवूडमधली अंत्ययात्रा म्हणतात. केवळ शोसाठी! एकदा एक ९० वर्षांचा म्हातारा तिरडीवर पडलेला असताना त्याच्या ६५ वर्षांच्या मुलानं गाडी करूया का असं भीत भीत तात्यांना विचारलं होतं. बापाला खांदा देत रस्त्यानं चालायला लाज वाटते का असं जाहीरपणे त्यांनी विचारलं होतं. त्यावर अहो आता माझंही वय झालंय, मला नाही झेपणार खांदा देत इतकं चालणं असं बिचारा म्हणाला. इतकं झालं तरी पडतं घेतील ते तात्या कसले… हे बघा असली फालतू कारणं देऊ नका. बापाला खांदा देताना तुम्हाला यमाचं बोलावणं आलं तर या पुण्यासाठी थेट स्वर्गातच जाल काळजी नसावी असा मोलाचा उपदेश करत त्यांनी ६५च्या त्या म्हाताऱ्याला तिरडीला जुंपलंच शेवटी!

कुणा मुलानं गोटा करायला नकार दिला की त्यांचा राग अनावर होतो. सिनेमात खोट्या बापाच्या खोट्या निधनासाठी गोटा करतात हीरो लोकं, कारण तो सीन खरा वाटायला हवा म्हणून.. आणि इथं तुझा खरा बाप खरोखर शेवटचा मेलाय तर तुला लाज वाटते गोटा करायची असं खडसावत ते चार पिढ्या खाली आणतात. गावातल्या या भागात त्यामुळे तात्या नावाची दहशत आहे. पण, त्यांची उपयुक्तताच इतकी प्रचंड आहे की शिव्या खाल्या तरी त्यांना कुणी सहसा दुखवत नाही. सामान कुठे मिळतं, स्मशानात नक्की कुठली कागदपत्रं दाखवायला लागतात, रॉकेल किती लागतं व कोण आणून देतं इथपासून ते किती वाजता अस्थी आणायला जायचं आणि त्यांच्या विसर्जनाची तजवीज काय इथपर्यंत सगळी टेस्टेड ओके यादीच त्यांना मुखोद्गत आहे. त्यामुळे अमेरिकेच्या दोन कोस्टमधलं अंतर एग्झॅक्ट किती आहे हे माहिती असलेल्या परंतु कुठलं स्मशान जवळ आहे नी गॅस किंवा डिझेलची शवदाहिनी कुठे आहे हे माहिती नसलेल्या किंवा पुजेच्या नी श्राद्धाच्या भटजींमध्ये फरक असतो हे गावीदेखील नसलेल्या नवीन पिढीतील तरूणांनाही घराची लोकसंख्या कमी झाल्यावर तात्यांचाच आधार असतो.

नव्या पिढीचं सोडा, आम्हाला आता सगळं माहिती आहे. जे जे तात्यांना माहित्येय ते सगळं आम्हीही जाणतो. परंतु तरीही आम्हीपण तात्यांना या बाबतीत दुखवू नाही शकत. कारण ते या बाबतीत अत्यंत भरवशाचे आहेत. ज्याप्रमाणे सचिन तेंडुलकर किंवा आता विराट कोहली पिचवर असेपर्यंत सामना जिंकायची शाश्वती असते, त्याप्रमाणे तात्या असतील तर शेवटचा प्रवास यथासांग व निर्विघ्न पार पडणार याची हमीच असते. त्यामुळे, तात्यांना ओळखणाऱ्या सगळ्यांची शेवटची इच्छा एकच असते, “हं उचला आता, हे शेवटचे शब्द तात्यांचेच असावेत!”

ओम शांती शांती शांती!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 31, 2018 2:04 pm

Web Title: blog on director of funeral
Next Stories
1 BLOG: सचिन तेंडुलकरचं नाव ठेवलं या संगीतकारावरुन
2 Blog: साक्षात ‘देवा’ची भेट
3 मुंबईच्या पावभाजीचे सुवर्णमहोत्सवी वर्ष !
Just Now!
X