तो आला… त्याने पाहिले… तो लढला… आणि त्याने जिंकून घेतले सारे… अशाच काहीशा शब्दात ‘डेडमॅन द अंडरटेकर’च्या संपूर्ण कारकिर्दिचे वर्णन करता येईल. ‘डब्ल्यू डब्ल्यू ई’मध्ये आजवर ४०० हून अधिक खेळाडू आले ‘स्टोन कोल्ड स्टीव ऑस्टिन’, ‘जॉन सीना’, ‘द रॉक’, ‘शॉन माइकल’, ‘ट्रिपल एच’, ‘हल्क होगन’, ‘ब्रेट हार्ट’, ‘गोल्डबर्ग’, ‘ब्रॉक लेसनर’, ‘रे मिस्टेरिओ’ परंतू ‘डेडमॅन द अंडरटेकर’ म्हणजे इसकी झलक तो सबसे अलग…

सन १९९० ‘डब्ल्यू डब्ल्यू ई’ रिंग मध्ये सर्वत्र अंधार पसरला. स्क्रीनवर अक्राळ विक्राळ चित्रे दिसू लागली, हॉरर चित्रपटातील संगीत सूरु झाले आणि एक व्यक्ति अंधारातून प्रकाशाच्या दिशेने येताना दिसला, तो रिंगमध्ये आला टोपी काढून त्याने डोळे फिरवले आणि समोरील प्रतिस्पर्ध्याला तूझी ही शेवटची फाईट असा इशारा केला. पूढे काही मिनिटे त्याने प्रतिस्पर्ध्याला धोपटून काढले. सामना संपल्यानंतर तो कोण आहे हा एकच प्रश्न प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर होता, त्याने हातात माईक घेतला आणि स्वत:चे नाव ‘अंडरटेकर’ असून तो एक मृत व्यक्ती आहे असे सांगितले त्यानंतर त्याने ‘यू विल रेस्ट… इन… पीस!’ (You will rest…in…peace!) हा मंत्र प्रेक्षकांना दिला आज गेली २९ वर्षे या मंत्राचा जप ‘डब्ल्यू डब्ल्यू ई’ चा प्रेक्षकवर्ग करत आहे.

‘द अंडरटेकर’ या शब्दाचा समानार्थी शब्द ‘भीती’ असा म्हणता येइल. याला नायक म्हणावे की खलनायक हा प्रश्न डब्ल्यू डब्ल्यू ई च्या प्रेक्षकांना गेली २६ वर्षे पडला आहे कारण याने ‘स्टोन कोल्ड स्टीव ऑस्टिन’ प्रमाणे स्वत:ची बीयर प्रेक्षकांशी कधी शेअर केली नाही ‘जॉन सीना’ प्रमाणे थेट प्रेक्षकांमध्ये जाउन कधी बसला नाही. ‘डिन अँब्रोज’, ‘डाल्फ झिग्लर’, ‘द मीझ’, ‘लुक हार्पर’, ‘वेड बॅरेट’ यांच्याप्रमाणे याने प्रेक्षकांना कधी तूच्छ लेखले नाही पण काहीतरी नक्कीच आहे जे ‘अंडरटेकर’ला इतर खेळाडूंपेक्षा वेगळे ठरवते. ‘केन’, ‘ब्रे व्याट’ यांना पाहून प्रेक्षकांना भीती वाटते, ‘जॉन सीना’, ‘द रॉक’, ‘रेंडी ऑर्टन’ यांना पाहून आनंद होतो ‘गोल्डबर्ग’, ‘स्टोन कोल्ड स्टीव ऑस्टिन’, ‘ब्रॉक लेसनर’ यांना प्रतिस्पर्ध्याला मारताना पाहून त्याची दया येते, ‘रे मिस्टेरिओ’, ‘शॉन माइकल’, ‘लूचा ब्रदर्स’ यांना खेळताना पाहून आश्चर्य वाटते, ‘खली’ला पाहून आंम्हा भारतीयांना अभिमान वाटतो, पण ‘अंडरटेकर’ हा एकमेव व्यक्ती आहे ज्याच्या फक्त उपस्थितीनेच वातावरणात उत्साह संचारतो, त्याला पाहिले की अंगावर शहारा येतो, त्याच्या प्रतिस्पर्ध्याची किव येते, पण त्याला हरताना पाहिले की का कुणास जाणो लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्या डोळ्यात पाणी येते. कुस्तीच्या जगतात कित्येक स्टार खेळाडू आले आणि गेले पण ‘अंडरटेकर’ला पाहिले की ‘सुपरस्टार’ या शब्दाचा खरा अर्थ कळतो.

‘द डेडमॅन मिस्ट्री’

‘वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट’मध्ये भाग घेण्यासाठी खेळाडूंनी एक विशिष्ट पेहराव परिधान करणे गरजेचे असते. या अटीची पूर्तता करण्यासाठी अंडरटेकरने ‘द डेडमॅन’ हा पेहराव स्वीकारला. सुरवातीला हे विचित्र वाटले पण हळूहळू लोकांना ते आवडले. पूढे डब्ल्यू डब्ल्यू ई च्या क्रिएटिव्ह टिमने अधिक जोरदार पद्धतीने त्याचा प्रचार केला. त्याचा पेहराव, त्याचे वागणे, बोलणे सर्व काही हॉरर चित्रपटातील भूतांप्रमाणे केले. काळोखात चर्चची घंटा वाजते, आणि उजेड होताच अंडरटेकर प्रतिस्पर्ध्याच्या मागे उभा राहतो, त्यानंतर तो त्याला धोपटून काढतो समोरील व्यक्तीला नामोहरम केल्यावर पून्हा दिवे विझतात आणि लगेचच उजेड होतो आणि अंडरटेकर गायब या एंट्रीने तर अंडरटेकर खरोखरच भूत आहे की काय ही शंका निर्माण केली. पूढे तो स्मशानात राहतो, शवपेटिकेत झोपतो, मृतदेह खाउन पोट भरतो, त्याचा जीव एका कलषात आहे, तो सात वेळा मरुन जिवंत होउ शकतो अशी मिथके त्याच्या नावाभोवती फिरु लागली आणि ‘अंडरटेकर’ या नावाला ‘द डेडमॅन’चे स्वरुप आले. याचा पूरेपूर फायदा ‘डब्ल्यू डब्ल्यू ई’ ने घेतला आणि हा कार्यक्रम लोकांच्या आयुष्यातील एक घटक बनला.
२४ मार्च १९६५ साली पृश्वीवर अवतरलेल्या ‘मार्क विलियम कॅलवे’ नामक स्पोर्ट मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्याला आपण ‘द अंडरटेकर’ होउ असे कधी वाटले नव्हते पण त्याच्यात कुस्तीची आवड निर्माण झाली आणि बघता बघता हा कुस्तीवीर ‘द डेडमॅन अंडरटेकर’ झाला.

‘कालाय तस्मै नमः’

अंडरटेकर ने डब्ल्यू डब्ल्यू ई मध्ये ‘अनस्टॉपेबल’ म्हणून ओळख निर्माण केली. १९९१ साली ‘जीमी स्नूका’ ला हरवून त्याने आपला विजयरथ सूरु केला पूढे ‘जॅक रॉर्बट’, ‘जायंट गोंझालोस’, ‘किंग कॉंग बडी’, ‘केन’, ‘मार्क हेनरी’, ‘रेंडी ऑर्टन’, ‘ट्रिपल एच’ अशा २४ कूस्तीपटूंना त्याने सलग हरवले. मात्र, २५ व्या सामन्यात ‘ब्रॉक लेसनर’ ने अंडरटेकर हरवून त्याचा विजयरथ रोखला. अंडरटेकरला हरवणारा तो जगातील ‘पहिला’ खेळाडू होता पण एक वर्षाच्या आत झालेल्या रिमॅचमध्ये त्याने ब्रॉक लेसनरला हरवून आपला हिशोब चूक्ता केला. अंडरटेकरचे वय झाले असले तरी पून्हा एकदा त्याच जिद्दीने त्याने २६ व्या सामन्यात ‘ब्रे व्याट’ ला हरवले आणि ‘डब्ल्यू डब्ल्यू ई’ मधील आपली दहशद पूर्नप्रस्थापित केली.

सामना नंबर २७ मध्ये २५-१ या विक्रमासहीत त्याचे रिंगमध्ये आगमन झाले पण हा सामना त्याच्या कारकिर्दीचा शेवटचा सामना ठरला. ‘रोमन रेन्स’ने अंडरटेकरला हरवले. हा त्याच्या कारकिर्दीतला ‘दूसरा’ पराभव होता, यापूढे ताज्या दमाच्या कूस्तीपटूंपूढे त्याचा निभाव लागणार नाही हे त्याने ओळखले आणि आपली कारकिर्द थांबवण्याचा निर्णय घेताला. अंडरटेकरला हरवणे कित्येक खेळाडूंचे पहिले स्वप्न होते जे त्यांच्या कारकिर्दीच्या शेवटपर्यंत कधी पूर्ण झालेच नाही.

या जगात माझा एकच शत्रू आहे तो म्हणजे वेळ कारण मी त्याला रोखू शकत नाही. लोकांना मी डेड मॅन म्हणून आवडतो जर त्यांना आनंद मिळणार असेल तर मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मृत राहणे पसंत करेन अशा काहिशा शब्दात त्याने माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत मनोगत व्यक्त केले होते. अंडरटेकरच्या निवृत्तीनंतर कुस्ती जगातील एक यूग संपले, आता तो पुन्हा रिंगमध्ये दिसणार नाही तरी देखील ‘द डेड मॅन’ जनसामान्यांच्या मनात कायम जिवंत राहिल. खरच तो आला… त्याने पाहिले… तो लढला… आणि त्याने जिंकून घेतले सारे…