– शेखर जोशी

भारताचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे जम्मू-काश्मीर गेल्या अनेक वर्षांपासून धगधगत आहे. भारताचा अविभाज्य भाग असलेले जम्मू-काश्मीर दहशतवाद्यांच्या ‘नापाक’ इराद्याने शापित ठरले आहे. अशा परिस्थितीत या प्रदेशातील भारतीयत्वाला सर्व भारतीयांशी जोडण्यासाठी ‘हम’ या सामाजिक, शैक्षणिक संस्थेतर्फे तिथे काम सुरु आहे. ‘हम साथ साथ है जोडो जम्मू-काश्मीर’ हाच ‘हम’चा मुख्य उद्देश आहे.

जम्मू-काश्मीर आणि सीमेलगत राहणा-या भागात सतत अस्थिर वातावरण असते. मात्र अशा वातावरणातही तेथील मुलांचे शिक्षण सुरु राहण्यासाठी ‘हम’ प्रयत्न करत आहे. तसेच जम्मू-काश्मीर मधील मुलांवर, विद्यार्थ्यांवर आपण भारताचाच अविभाज्य घटक आहोत, आपण वेगळे नाही हे पटवून देण्याचाही प्रयत्न विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि वैचारिक उपक्रमातून ‘हम’कडून केला जात आहे.

याच सांस्कृतिक-वैचारिक देवाणघेवाणीचा एक भाग म्हणून यंदा ‘हम’तर्फे जम्मू-काश्मीरमधील काही विद्यार्थींनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित केल्या जाणा-या नववर्ष स्वागत यात्रेसाठी डोंबिवली, मुंबई भेटीसाठी येणार आहेत. इयत्ता पाचवी ते दहावीत असलेल्या या काश्मीरी, लडाखी, डोगरी विद्यार्थीनी जम्मू येथील सेवा भारतीच्या छात्रावासात शिकत आहेत. डोंबिवलीतील नववर्ष स्वागतयात्रेत या मुली सहभागी होणार असून नंतर मुंबई दर्शनही करणार आहेत. या मुलींना आपल्या येथील जीवनशैलीचा अनुभव घेता यावा आणि त्या अनुभवातून सांस्कृतिक आदानप्रदान व्हावे हा या मागचा उद्देश आहे.

‘हम’च्या या विविध उपक्रमात जागरुक आणि राष्ट्रप्रेमी नागरिक म्हणून प्रत्येकाचा काही ना काही खारीचा वाटा असावा आणि हे काम पुढे सुरु राहण्यासाठी जमेल तसे मानसिक, शारीरिक, आर्थिक पाठबळ द्यावे, असे आवाहन ‘हम’ने केले आहे.

‘हम’ संस्थेच्या कामाविषयी अधिक माहिती आणि मदतीसाठी संपर्क करा हम’ चॅरिटेबल ट्रस्टचे (प्रस्तावित) अध्यक्ष सुनील देशपांडे यांना 98198 72871 या क्रमांकावर.