12 August 2020

News Flash

BLOG : तबलीगी मरकजच्या निमित्तानं; मुस्लिम मनाची वैशिष्ट्ये

ज्येष्ठ साहित्यिक शेषराव मोरेंच्या "मुस्लिम मनाचा शोध" पुस्तकात दिलेली मुस्लिम मनाची वैशिष्ट्ये जाणून घेऊ

– चंदन हायगुंडे

कोरोना विषाणूचा प्रसार झाल्याने तबलीगी जमातच्या दिल्ली येथील निजामुद्दीन मरकजच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या देश विदेशातील शेकडो मुसलमानांना शोधून त्यांची वैद्यकीय चाचणी आणि उपचार करण्याचे काम सुरु आहे. मरकज मधील काही सहभागींचा करोनामुळे जीवही गेला आहे. त्यातच तबलीगी जमातचे प्रमुख मौलाना साद यांचा ऑडिओ समोर आला ज्यात ते करोनाच्या अनुषंगाने “ये ख्याल बेकार है कि मस्जिद में जमा होने से बिमारी पैदा होगी, मैं कहता हूं कि अगर तुम्हें यह दिखे भी कि मस्जिद में आने से आदमी मर जाएगा, तो इससे बेहतर मरने की जगह कोई और नहीं हो सकती” अशाप्रकारचे वक्तव्य करीत आहेत. या प्रकारामुळे तबलीगी जमात आणि इस्लामबाबत देशभरात चर्चा सुरु आहे. यानिमित्ताने इस्लाम अभ्यासक व बुद्धिवादी साहित्यिक शेषराव मोरेंच्या “मुस्लिम मनाचा शोध” पुस्तकातील “भूमिका” प्रकरणात दिलेली मुस्लिम मनाची वैशिष्ट्ये जाणून घेऊ.

शेषराव मोरे लिहितात –

व्यक्तीप्रमाणे प्रत्येक समाजाला एक मन असते. मन ही अशी गोष्ट आहे की, जी कळते, अनुभवला येते, पण तिचे वर्णन नेमक्या शब्दात करता येत नाही. ते मन कसे तयार झाले याची काही करणे स्थूल मनाने सांगता येतात, पण सर्व कारणांचा शोध घेत येत नाही, लागत नाही. हिंदू समाजाचे मन हे एक प्रकारे सर्व समावेशक मन आहे. एका पातळीवर परस्परात विभाजन करून पंथ, जाती, उपजाती, असे तुकडे पडून जगणारे, तर दुसऱ्या पातळीवर आपण सारे एकाच आहोत; तुमचेही सत्य आमचेही सत्य आहे; सर्व सत्य एकाच असते, फक्त त्या सत्याकडे जाणारे मार्ग वेगवेगळे असतात; तुम्ही तुमच्या मार्गाने जा, आम्ही आमच्या मार्गाने जातो; मात्र एकत्र राहून परस्परांचा, मानवतेचा उद्धार करूया असे मानणारे हे हिंदू मन आहे. एका बाजूने पराकोटीचा संकुचितपणा व अनुदारपणा आणि दुसऱ्या बाजूने उदात्ततेची व सहिष्णुतेची परिसीमा असे हे मोठे विलक्षण मन आहे. आणि हे मन त्यांच्या धर्मविचारांतून, परंपरेतून, हजारो वर्षांच्या संस्कारातून निर्माण झालेले आहे.

हिंदू मनाप्रमाणे मुस्लिम मनाचेही नेमक्या शब्दात वर्णन करता येत नाही, पण त्याची काही वैशिष्ट्ये सांगता येतात.

१) पहिले किंबहुना एकमेव व पायाभूत वैशिष्ट्य म्हणजे मुस्लिम मन हे अतिशय धर्मनिष्ठ आहे. खरे म्हणजे हे वैशिष्ट्य केवळ मुस्लिम मनाचे नाही. हिंदू मनाचेही ते वैशिष्ट्य आहे. हिंदू हा मुसलमानापेक्षा कमी धर्मनिष्ठ नाही. नरहर कुरुंदकरांच्या शब्दांत सांगायचे तर: हिंदुसमाज जितका आणि जेवढा धर्मश्रद्ध आहे, तितकाच, कदाचित थोडा कमी, मुस्लिम समाज धर्मश्रद्ध आहे. हिंदूंची धर्मश्रद्धा, त्यांचे धर्मवेड चटकन जाणवत नाही. मुस्लिम समाजाचे धर्मवेड जाणवते. या जाणवण्याचा फरक यासाठी पडतो कि, मुसलमान हे धर्मासंबंधी अतिशय आग्रही असतात; त्या आग्रहाचे विविध प्रकारे दर्शन घडवतात; धर्मटिका व धर्मविरोध सहन करत नाहीत; आपला विरोध संघटीतपणे व आक्रमक पणे व्यक्त करतात, त्यामुळे धर्मश्रद्धा अधिक ठळकपणे लक्षात येते. मात्र, हिंदूंची विरोध व्यक्त करण्याची, आपल्याच धर्माला चिटकून राहण्याची, विरोधकांचा विरोध शून्यवत करण्याची पद्धत वेगळी आहे. विरोधकांना संघटीतपणे किंवा आक्रमकपणे विरोध न करता त्यांच्या विरोधाला उपेक्षेने मारण्याची व आपण पूर्वीप्रमाणेच धर्मानुसार चालत राहण्याची त्यांची पद्धत असते.

२)  मुस्लिम समाजाचे वा मनाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे स्वतःचे अलगत्व व विशेषत्व टिकविण्यासाठी ते अतिशय कसोशीने प्रयत्न करतात.
आपल्या धर्मविचारांत, आचारात इतर धर्मांचे विचार, आचार येऊ न देत तो धर्म विशुद्ध व वैशिष्ट्यपूर्ण ठेवण्याचा ते कटाक्षाने प्रयत्न करतात. त्यामुळे इतर धर्मातील व समाजातील कोणत्याही गोष्टी स्वीकारायला ते तयार नसतात. वस्तुतः अनेक काळच्या सहवासाने इतर धर्मीयांचा त्यांच्यावरही काही परिणाम झालेला असतो. भारतामध्ये हिंदूंचा त्यांच्यावर बर्याच बाबतीत परिणाम झालेला आहे. हिंदूंचे काही विचार, आचार, प्रथा, परंपरा त्यांनीही नकळत स्वीकारलेल्या आहेत. परंतु अशा गोष्टी गैरइस्लामिक आहेत असे त्यांच्यातील धर्मपंडित सांगत असतात. धर्मनिरपेक्ष लोकशाही, भौगोलिक राष्ट्रवाद, जनतेचे संसदेचे वा राज्यघटनेचे सार्वभौमत्व या गोष्टीही गैरइस्लामिक आहेत असे आग्रहपूर्वक प्रतिपादन करणारे अनेक मुस्लिम धर्मपंडित आहेत. आपला धर्म विशुद्ध राहण्याच्या प्रयत्नांचा हा भाग आहे. त्यामुळे दोन धर्मांचा समन्वय, परस्परांच्या धर्माची तत्वे स्वीकारणे किंवा सर्व धर्मातील चांगली तत्वे घेऊन सर्वांकरिता एक नवा धर्म तयार करणे या कल्पनांना त्यांचा विरोध असतो. सर्व धर्म समभावाच्या तत्वावर सम्राट अकबराने “दिन – ए – इलाही’ हा धर्म स्थापन केला. मात्र, त्या संबंधात मौ. मोहंमद युसुफ यांच्यासारख्या थोर धर्मपंडिताने व नेत्याने म्हटले आहे की “अकबर हा मार्गभ्रष्ट झाला होता. धर्माचा विपर्यास केला (perverted the religion itself).”

३) मुस्लिम धर्मश्रद्ध मनाचे तिसरे वैशिष्ट्य म्हणजे आपला धर्म ईश्वरी, एकमेव सत्य असणारा, सर्व जीवनाचे मार्गदर्शन करणारा, परिपूर्ण व आदर्श आहे एवढेच ते मानीत नाहीत तर तो धर्म शाश्वत, अंतिम व अपरिवर्तनीय आहे असेही मानतात. त्यामुळे धर्माला मान्य नसणाऱ्या कोणत्याही सुधारणा स्वीकारण्यास ते तत्वतः तयार नसतात. प्रत्येक गोष्ट स्वीकारताना त्याला धर्माचा आधार आहे का नाही हे पाहतात. तसा आधार नसेल तर ती गोष्ट स्वीकारत नाहीत. आधुनिक विचार मानणारे मुस्लिम विचारवंतही नवे विचार स्वीकारण्यासाठी त्यास धर्माचा आधार देतात. आधुनिकताही धर्माच्या चौकटीत बसवून मगच स्वीकारली जाते.

पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारताचे विमान अपहरण केले, तेव्हा ते करणे इस्लामच्या विरुद्ध आहे म्हणून भारतीय मुस्लिम धर्मपंडितांनी आवाज उठविला. तथापि, ते कृत्य इस्लामनुसार असो कि नसो, ते आधुनिक जागतिक तत्वानुसार व मानवी मूल्यांनुसार चूक व अयोग्य आहे असे स्पष्टीकरण त्यांच्या मनात असले तरी त्यांनी प्रकटपणे दिले नाही. स्वीकारावयाची प्रत्येक गोष्ट इस्लामच्या चौकटीत बसवून व त्यास शास्त्राधार देऊन स्वीकारणे हे मुस्लिम मनाचे एक वैशिष्ट्य आहे. त्यामुळे मुस्लिम समाजात काम करू पाहणारा कोणताही सुधारक प्रत्येक सुधारणा ही धर्माशी कशी सुसंगत आहे, हे सांगत असतो.  एखादी सुधारणा धर्मानुसार असो की नसो, ती आजच्या काळास अनुरूप व आपल्या हिताची असल्यामुळे तुम्ही स्वीकारा असे आवाहन कोणताही सुधारक मुस्लिम समाजाला करू शकत नाही, करीत नाही. असे आवाहन करणारे हमीद दलवाई एक अपवाद होते. तेंव्हा आपल्या अंतिम व परिपूर्ण धर्मात सुधारणा करणे मुस्लिम समाजाला धर्मविरोधी वाटते.

४) मुस्लिम समाजाचे चौथे वैशिष्ट्य म्हणजे, धर्मात नसलेल्या वा धर्मविरोधी असलेले आम्ही काहीही स्वीकारणार नाही असे ते कितीही म्हणत असले तरी अशा अनेक सुधारणा त्यांनी पण नकळत किंवा धर्माचे शिक्कामोर्तब करून स्वीकारलेल्या आहेत. मूळ धर्मातील सर्वच गोष्टी मुसलमान हे बहुसंख्य असतील किंवा त्यांचे इस्लामिक राज्य असेल तरच पाळता येणाऱ्या आहेत. संपूर्ण इस्लाम काटेकोर स्वरुपात पाळणे प्रत्येक वेळी शक्य नसते. अशा वेळी मुस्लिम समाज प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेत असतो. त्यासाठी त्यांना प्रेषितांच्या जीवनाचा आधार मिळतो.

मक्केत असताना प्रेषित बहुसंख्य असणार्या तेथील मूर्तिपूजकांशी जुळवून घेत वागत होते. तेथे त्यांना व त्यांच्या अनुयायांना परिपूर्ण इस्लाम पाळता येत नव्हता. आरंभीची काही वर्ष तर त्यांना आपली श्रद्धा लपवून ठेवावी लागत होती. उघडपणे प्रचार सुरु केला तेंव्हा त्यांच्या अनुयायांचा छळ होऊ लागला. तो सहन करण्याचा व संयम पाळण्याचा त्यांना प्रेषितांनी उपदेश केला होता. प्रतिकार करण्याचा आदेश दिला नव्हता. आपल्याला उचलत नाही तेवढे ओझे  घेण्यास अल्लाह सांगत नसतो, अशी  कुराणात वचने  आहेत. इस्लाम हा व्यावहारिक मार्गदर्शनातूनच तयार झालेला धर्म आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या परिस्थितीत कसे वागावे याचे त्यात मार्गदर्शन आहे. मुस्लिम मनाचे हे महत्वाचे वैशिष्ट्य काळजीपूर्वक समजून घेण्यासारखे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2020 3:39 pm

Web Title: tabligi markaj search of muslim mindset
टॅग Coronavirus
Next Stories
1 BLOG: मोदींचे ‘आरवणे’ अन् करोनाचे मावळणे!
2 BLOG : भाजी खाणे तुमच्या जिवापेक्षा महत्त्वाचे आहे का?
3 …अन् चंद्रावरुन आलेल्या त्या तिघांना २१ दिवस क्वारंटाइन करण्यात आलं
Just Now!
X