“फॅमिली मॅन”चा झाला “सुपरमॅन”

हेर म्हणून नोकरी सोडल्यावर त्या माणसाने एखाद्या मिशनची माहिती ठेवणं, आपल्या जुन्या सहकाऱ्याला मार्गदर्शन करणं हे केवळ अशक्य आहे

Manoj Bajpayee the family man 2
'द फॅमिली मॅन २' ही वेब सीरिज अ‍ॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.

श्रुति गणपत्ये
मनोज वाजपेयीच्या “द फॅमिली मॅन”चा पहिला सीझन हा सगळ्यांना आवडून गेला. भारतीय मनोरंजन विश्वामध्ये वास्तवाला धरून काही गोष्टी लिहिल्या जात आहेत याचा आनंदच होता. कारण गुप्तहेर म्हटला की त्याच्या नावावर एकेक पराक्रम खपवण्यामध्ये आपलं बॉलिवूड आणि अर्थात हॉलिवूडही कायम पुढे राहिलं आहे. पण “द फॅमिली मॅन”च्या दुसऱ्या सीझनने मात्र मनोज वाजपेयीला एकदाचा सुपरमॅन बनवूनच टाकला. कोणतंही मिशन पूर्ण करणारा, हेर म्हणून नोकरी सोडूनही हेरगिरीच्या मिशनबद्दल माहिती ठेवणारा, पाकिस्तानच्या शत्रूला हरवणारा, वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही आयुष्यांमध्ये टॉप राहणारा या सगळ्या साच्यात त्याला बसवून टाकला. फक्त चांगलं चित्रीकरण, लंडनला राहणारे शत्रू, श्रीलंकेच्या तामिळ लिट्टे वादाशी जोडलेला संबंध यामुळे कथा कंटाळवाणी होत नाही. पण पुढे काय होणार हे नक्कीच सांगता येतं.

या मालिकेचा पहिला सीझन लोकांना आवडण्याचं सगळ्यांत मोठं कारण होतं ते म्हणजे मनोज वाजपेयी. मिशन सोडलं तर इतरवेळी सामान्य माणसाप्रमाणे झगडणारा एक होता म्हणून. त्याचे बायकोशी असणारे भांडणं, बायकोच्या मित्राविषयी संशय, बापाला गुंडाळून टाकणारी पोरं अशी सामान्य लोकांची कथाच त्यात मांडली होती. बॉलिवूडच्या हेरपटांवर नजर फिरवली तर गेल्या २० वर्षांमध्ये सनी देओलचा “द हिरोः लव स्टोरी ऑफ अ स्पाय”, सलमान खानचा “एक था टायगर” आणि “टायगर जिंदा है”, सैफ अली खानचा “एजंट विनोद”, हुमा कुरेशीचा “डी डे”, सोनाक्षी सिन्हाचा “फोर्स २”, तापसी पन्नूचा “नाम शबाना”, आलिया भट्टचा “राझी” असे अनेक चित्रपट सांगता येतील. त्यातील बहुतेक हिट होते. “राझी” आणि “डी डे” असे एखाद दोन अपवाद सोडले तर बाकी सगळे एकदम मसाला चित्रपट होते. सगळ्या भारतीय हेर चित्रटांमध्ये पाकिस्तान शत्रू गरजेचा असतो, तो क्रूर असतो, चुकीचा असतो आणि मूर्खही. त्या सगळ्यावर मात करून आमचे भारतीय सुपर हेर हे काहीही कामगिरी बजावू शकतात, जगात कुठेही जाऊ शकतात. खरंतर सुपर हिरो यांच्या व्याख्येतच या हेरांना बसवलं जातं. आणि या सगळ्याचा एकच शेवट असतो तो म्हणजे भारतीय हेर हुशार असतात आणि नेहमी तेच जिंकतात. जेम्स बॉन्डचे सगळेच चित्रपट लोकप्रिय आहेत आणि ते सुपर हिरो या एका कथानकाभोवतीच फिरतात. पण त्यात किमान आभासी जगाचा दृश्य परिणाम छान असतो आणि लॉजिकल प्रश्न विचारायचे नाहीत हे आधीच ठरलेलं असतं.

“द फॅमिली मॅन”ने ती चौकट मोडली होती. त्यामुळे दुसऱ्या भागाकडून सहाजिकच जास्त अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. मात्र लोकप्रियतेच्याच मागे गेल्याने दुसरा सीझन चौकटीतच जाऊन बसला. मूळात हेर म्हणून नोकरी सोडल्यावर त्या माणसाने एखाद्या मिशनची माहिती ठेवणं, आपल्या जुन्या सहकाऱ्याला मार्गदर्शन करणं, पाहिजे तेव्हा नोकरीवर परत येणं हे केवळ अशक्य आहे. त्यात त्याच्या मुलीला पळवून नेण्याचा रचलेला कट म्हणजे आणखीनच बिनडोकपणा आहे. कारण संपूर्ण भारतीय गुप्तहेर खात्यात एकच हेर एवढा ग्रेट असू शकतो तर त्यालाच बॉस बनवायला हवं ना. पाहिजे तेव्हा तो श्रीलंकेचं मिशन बघतो, पाहिजे तेव्हा पळवून नेलेल्या आपल्या मुलीला सोडवतो. गुप्त हेरांच्या आयुष्यामध्ये अशक्य गोष्टी घडतात. पण आधी म्हटल्याप्रमाणे कथेने अपेक्षा वाढवल्याने निराशा जास्त होते. सलमान, सैफचा हेरपट किंवा बाॅन्डपट बघायचा असेल तर एवढे प्रश्न विचारणार नाही. मेंदू बंद ठेवून त्याचा आस्वाद घेता येईल. तसंच तामिळ लिट्टेची कथा दुसऱ्या सीझनमध्ये घेतल्याने अर्धी मालिका हिंदी आणि अर्धी तामिळमध्ये येते. जरी सबटायटल्स येत असले तरी हिंदी मालिका वाटतच नाही.

जाताजाता शेवटच्या भागामध्ये पुढच्या सीझनची थोडीशी झलक सोडली आहे. त्यात आता ईशान्य पूर्वेकडील राज्यातील वाद पुढे येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. कल्पना चांगली आहे. कारण त्या भागाबद्दल हिंदी सिनेमा, नाटक किंवा मालिकांमध्ये काहीच नसतं. ती राज्य आपल्याच देशातील आहेत याचा आपल्याला विसर पडतो. अशावेळी त्या भागातील काही वादग्रस्त मुद्दा मालिकेमध्ये येणार असेल तर पहायला नक्की आवडेल. पण मनोज वाजपेयी पुन्हा फॅमिली मॅन व्हावा अशी अपेक्षा ठेवूनच.

shruti.sg@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Samantha akkineni manoj bajpayee the family man 2 review avb