शिवसेनाप्रमुख स्मारक भूखंड हस्तांतर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक उभारण्यासाठी शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याचा भूखंड बाळासाहेब ठाकरे स्मारक न्यासाला हस्तांतरित करण्यास पालिका सभागृहाने मंजुरी दिली आहे; मात्र या प्रस्तावाला अद्याप राज्य सरकारची मंजुरी मिळाली नसून नव्या महापौरांसाठी अन्य ठिकाणी बंगल्याची व्यवस्था झालेली नाही. त्यामुळे ८ मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीत विजयी होणाऱ्या महापौरांची निवासाची व्यवस्था शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यातच करण्यात येणार आहे. नव्या बंगल्याची व्यवस्था झाल्यानंतर महापौरांचे बिऱ्हाड शिवाजी पार्क येथून हलविण्यात येणार आहे.

बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक महापौर बंगल्याच्या भूखंडावर उभारण्यावर राज्य सरकारने शिक्कामोर्तब केले असून पालिका सभागृहाने महापौर बंगल्याचा भूखंड बाळासाहेब ठाकरे स्मारक न्यासाकडे हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाला अलीकडेच मंजुरी दिली आहे. हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर हा भूखंड स्मारक न्यासाला हस्तांतरित करण्यात येणार आहे. या प्रक्रियेस किमान एक ते दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे, असे पालिका अधिकाऱ्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याच्या भूखंडावर बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात येणार असल्यामुळे नव्या महापौरांच्या निवासाची व्यवस्था भायखळा येथील वीरमाता जिजामाता भोसले प्राणिसंग्रहालय आणि उद्यानातील बंगल्यामध्ये व्यवस्था करण्यात येणार आहे. सध्या या बंगल्याची डागडुजी आणि रंगरंगोटीचे काम हाती घेण्यात आले आहे. महापौर निवडणूक जवळ आली तरी या बंगल्याच्या रंगरंगोटीचे काम पूर्ण झालेले नाही. तसेच शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याचा भूखंड अद्याप स्मारक न्यासास हस्तांतरित करण्यात आलेला नाही. त्यामुळे काही महिन्यांसाठी नव्या महापौरांच्या निवासाची व्यवस्था शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यामध्येच करण्यात येणार आहे, असे या अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. पालिकेच्या प्रस्तावास सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर भूखंडाचे हस्तांतरण करण्यात येणार आहे. तोवर भायखळा येथील महापौर बंगल्याच्या रंगरंगोटीचे काम पूर्ण होईल. यामुळे तूर्तास काही दिवस तरी नव्या महापौरांना समुद्रकिनारी असलेल्या बंगल्यामध्ये वास्तव्य करता येणार आहे.