मुंबई महापालिकेत सत्तास्थापनेसाठी शिवसेना आणि भाजपत संघर्ष सुरू आहे. या सत्तासंघर्षात शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसच्या नेत्यांकडून वक्तव्ये केली जात आहेत. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ‘गुगली’ टाकून राजकीय संभ्रम निर्माण केला आहे. मुंबईत राष्ट्रवादीने नऊ जागा जिंकल्या आहेत. मात्र, भाजपला पाठिंबा देणार नाही. वेळ आल्यास शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत स्थानिक नेते विचार करतील, असे शरद पवार यांनी सांगितले.

राज्यातील सर्व महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेससोबत आघाडी करण्याबाबत चर्चा झाली आहे. आघाडी झाली तर राज्यातील १७ ते १८ जिल्हा परिषदांवर आघाडीची सत्ता येईल, असेही ते म्हणाले. नांदेडमध्ये एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करू. याबाबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यात चर्चा झाली आहे, असेही त्यांनी सांगितले. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत बैठक होणार आहे. त्यात चर्चा करण्यात येईल, असेही ते म्हणाले. मुंबईत कोणत्या पक्षाचा महापौर होणार, याबाबत राज्यासह देशभरात उत्सुकता आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनेही या निवडणुकीत नऊ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे शरद पवार याबाबत कोणता निर्णय घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. त्याचवेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा देणार नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईत शिवसेनेचे ८४ तर भाजपचे ८२ उमेदवार निवडून आले आहेत. काही अपक्षांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्याने त्यांचे संख्याबळ वाढले आहे. मुंबईचा कारभार हा सुरळीत चालावा, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. शिवसेना उमेदवारांची जुळवाजुळव करेन, पण वेळ आली तर शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत पक्षाचे स्थानिक नेते विचार करतील, असे सांगून शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याचे संकेत पवार यांनी दिले आहेत. तत्पूर्वी काँग्रेसनेही भाजपला कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा देणार नाही, असे स्पष्ट केले आहे.