मुख्यमंत्र्यांचा घणाघात; भाजपची ‘औकात’ दाखविण्याचा निर्धार

भाजपशी युती केल्याने शिवसेना सडली, असा शिवसेना नेतृत्वाचा समज झाला असला तरी शिवसेनेमुळे मुंबई २५ वर्षे सडल्याचा घणाघाती हल्ला चढवित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेशी दोन हात करण्याचा संकल्प केला. भाजपची ‘औकात’ काय आहे हे २१ फेब्रुवारीला दाखवून देऊ, असा खणखणीत इशाराही त्यांनी शिवसेनेला दिला. दोन दिवसांपूर्वीचे उद्धव ठाकरे यांचे भाषण आणि त्याला फडणवीस यांनी दिलेला जवाब यावरून भाजप आणि शिवसेना या सरकारमध्ये मांडीला मांडी लावून बसणाऱ्या मित्रांमध्येच जंगी सामना होणार हे स्पष्ट झाले आहे.

महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती, ‘त्याच ठिकाणी’ शिवसेनेला प्रत्युत्तर देण्याकरिता भाजपने संकल्प मेळाव्याचे आयोजन केले होते. मुख्यमंत्री फडणवीस आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार या दोघांनीही शिवसेनेवर कठोर शब्दांमध्ये हल्ला चढविल्याने प्रचाराच्या काळात या दोन ‘मित्र’ पक्षांमध्ये आणखी आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडतील, अशीच लक्षणे आहेत. शिवसेना युतीमध्ये २५ वर्षे सडली, असा थेट हल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रजासत्ताकदिनी झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात चढविला होता. त्याचा खरपूस समाचार घेत शिवसेना नाही, तर इतकी वर्षे शिवसेना सत्तेत राहिल्याने मुंबई सडली आहे, असे शिवसेनेच्या वर्मी लागणआरे प्रत्युत्तर देत फडणवीस यांनी शिवसेनेच्या पालिकेतील कारभारांचे वाभाडेच काढले.

शिवसेनेशी हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर युती केली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, ज्येष्ठ भाजप नेते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी हिंदूत्वाच्या आणि शिवाजी महाराजांच्या एका विचाराने युती केली होती. शिवसेना आणि आम्ही विचाराने एकत्र असलो तरी त्यांचा आचार आम्हाला मान्य नाही. शिवसेना आमचा वैचारिक शत्रू नाही, पण आचार व भ्रष्टाचाराविरोधात लढाई होईल. पारदर्शी कारभार हाच आमचा अजेंडा असून कोणत्याही परिस्थितीत परिवर्तन होणारच, जे बरोबर येतील, त्यांना घेऊन किंवा येणार नाहीत, त्यांच्याशिवाय ते घडवू आणि धर्मयुध्दात भ्रष्टाचारी कारभार संपवू. शेवटी अंतिम विजय सत्याचाच व पारदर्शी कारभाराचाच होईल, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला लगावला. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचा दोन वेळा उल्लेख केला असला तरी त्यांचा सारा रोख हा शिवसेनेवरच होता. पालिकेचा कारभार आणि भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर शिवसेनेला जास्तीत जास्त बदनाम करण्यावरच मुख्यमंत्र्यांनी भर दिला होता व प्रचारात हाच मुद्दा राहील हे अधोरेखित केले.

शिवसेनेला पारदर्शी कारभार मान्य नसल्यानेच त्यांनी केवळ ६० जागा भाजपला दिल्या व त्यांना युती करायचीच नाही, हेच दाखवून दिल्याचे मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले. भाजपची औकात पाहूनच या जागा दिल्याचे शिवसेनेतील ‘शकुनी मामा’ यांनी सांगितले. पण आता निवडणुकीच्या रणधुमाळीत ‘औकात’ काय आहे, हे दाखवून देऊ, असे आव्हान फडणवीस यांनी दिले. निवडणुका आल्या की निविदा काढायच्या, घोषणा करायच्या हे आता बंद करायचे आहे, असेही फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.

हा तर विसरनामा

कोणाचे खून करुन आम्ही पक्ष वाढविला नाही असा टोला लगावत शिवसेनेचा वचननामा नाही तर विसरनामा असल्याची टीका मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा शिवसेनेला विसर पडलेला दिसतो. हे स्मारक आणि शिवाजी महाराजांचे स्मारक आम्ही पूर्ण करू, असे शेलार यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांचा आवाजच बसला

भाषणाच्या अखेरीस सारखे पाणी प्यावे लागत असल्याचा उल्लेख करीत मुख्यमंत्र्यांनी आता निवडणुकीत सेनेला पाणी पाजू, असे सांगितले आणि त्यांचा आवाजच बसला. भाषणाचा समारोप करताना त्यांना बोलण्याचाही त्रास होत होता. शिवसेनेच्या विरोधात बोलताना मुख्यमंत्र्यांचा आवाज बसला हा आयताच मुद्दा शिवसेनेला मिळाला आहे.

मुख्यमंत्र्यांचे वाग्बाण..

  • ‘करून दाखविले’ म्हणता, पण काय केलेत? जे होणारच होते त्याचे कसले श्रेय घेता?
  • सर्वसामान्यांना घर नाही, पिण्याचे पाणी, कचरा, स्वच्छता, आरोग्य आदी समस्या आहेत
  • मुदतठेवींमध्ये ४५ हजार कोटी रुपये असताना मैला व सांडपाणी समुद्रात सोडून किनारे खराब केले जात आहेत
  • प्रदूषणाचे प्रश्न आहेत, कचऱ्यावर प्रक्रिया नाही. मुंबईकरांचे जिणे शिवसेनेने सडविले आहे