नगरमधील दोन जागांवरून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप; काँग्रेसकडे पहिल्यांदाच उमेदवारीची मागणी कमी

राज्य पातळीवर काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करणारे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यात जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीत दोन गटावरुन पुन्हा जुंपली आहे. काँगेस पक्षाचे एबी फॉर्म विखे समर्थकांना मिळाल्यामुळे थोरात यांच्या समर्थकांनी बंडखोरी केली आहे. त्यानंतर एकमेकांवर शेलक्या शब्दांत त्यांनी वार सुरु केले आहे. थोरात यांनी विखे हे कुटील राजकारणी, घुसखोर असा तर विखे यांनी थोरात यांच्यावर काँग्रेस बंडखोर अशी टीका टिप्पणी केली आहे.

पालिका निवडणूकीत नगर जिल्ह्य़ातील काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का बसला. संगमनेर वगळता अन्य पालिका  हातून निघून गेल्या. त्यानंतर थोरात यांनी विखे यांची भाजपाबरोबर छुपी युती असल्याचा आरोप केला. काँगेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हस्तक्षेप करुन दोघांनाही शांत केले. त्यानंतर विखे व थोरात हे जिल्हापरिषद निवडणूकांच्या मोच्रेबांधणीसाठी एकत्र आले. त्यांनी एकत्रित बठका घेतल्या. विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघातील थोरात यांचे मेव्हणे आमदार डॉ. सुधीर तांबे यांचा विखे यांनी प्रचार केला. पण त्यांचे जिल्हापरिषद निवडणूकीच्या तिकिटावरुन पुन्हा एकदा बिनसले. त्यांनी एकमेकांवर जाहिर आरोप-प्रत्यारोप सुरु केले. त्यामुळे आता जिल्हापरिषदेच्या आश्वी व जोर्वे गटात विखे व थोरात समर्थक एकमेकांविरुध्द निवडणूक लढवित आहेत.

दोन गटांवरून मतभेद

संगमनेर तालुक्यात जिल्हापरिषदेचे ९ गट आहेत. त्यापकी आश्वी व जोर्वे या दोन गटांत काँग्रेसची उमेदवारी देण्यावरुन दोघांत मतभेद झाले. आश्वी हा गट संगमनेर तालुक्यात असला तरी तो पूर्वीपासून विखे समर्थकांना दिला जातो. जोर्वे हे गाव थोरात यांचे जन्मगाव आहे. मात्र या गटातील २२ गावे ही विखे यांच्या शिर्डी लोकसभा मतदार संघाला जोडलेली आहे. त्यामुळे पक्षाकडे विखे यांनी या दोन गटांवर दावा सांगितला. तर ही गावे संगमनेर तालुक्यातील असल्याने थोरात यांनी त्याकरिता आग्रह धरला. काँग्रेस पक्षाने आश्वी गटातून मोहिनी किशोर निघुते तर जोर्वे गटातून ललिता शंकर माळी यांना एबी फॉर्म दिले. तेथे थोरात यांनी पक्षाच्या निर्णयाविरुध्द उमेदवार उभे केले. आश्वीतून अरुणा विजय हिगे व जोर्वे येथून शांताबाई काळु खैरे यांना शेतकरी विकास मंडळाच्या नावावर थोरात यांनी उभे केले. आता त्यांच्या समर्थकांना कपबशी हे चिन्ह मिळाले आहे. शेतकरी विकास मंडळाचे उमेदवार हे काँग्रेसचेच असून कपबशी हे चिन्ह काँग्रेसचेच माना असे ते सांगत आहे. अन्य ७ गटांत थोरात समर्थकांना पक्षाचे एबी फॉर्म मिळाले असून पंजाच्या चिन्हावर ते निवडणूक लढवित आहेत.

आरोप-प्रत्यारोप

उमेदवारी डावलल्याने प्रचार शुभारंभाच्या सभेत थोरात यांनी विखे यांचा कुटील राजकारणी व घुसखोर असा उल्लेख केला. संगमनेरला सुसंस्कृत विकासाची परंपरा आहे. मात्र काही मंडळींना सेना, भाजपाचे मुखवटे घालुन उतरविण्यात आले आहे. आमची खऱ्या काँग्रेससाठी लढाई सुरु असून कुटील राजकारणाचा बंदोबस्त करु असा इशारा त्यांनी विखे यांचे नाव न घेता दिला. आम्ही कधी कुणाच्या वाटेत काटय़ा टाकल्या नाही, पण तरीदेखील काही लोक खोडा घालतात. कधी श्रीरामपूरात तर कधी राहुरीत घुसखोरी करतात. संगमनेर तालुक्यात ही घुसखोरी होवू देणार नाही. फितुरांना धडा शिकवू, खरी काँग्रेस आमचीच आहे अशी टिका थोरात यांनी विखे यांच्यावर केली.

विखे यांनीही थोरात यांच्यावर टिका करत मागील निवडणूकीचा फॉम्र्युला यावेळी वापरुन दोन्ही गट काँग्रेसला मिळाले. हे दोन्ही गट कोणाच्या नावावर नाहीत. माझ्याकडे विरोधी पक्षनेतेपद आहे याचे अनेकांना वाईट वाटते. त्यामुळेच त्यांनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांविरुध्द बंडखोरी केली. पक्षाच्या माध्यमातून मोठमोठी पदे भोगलेले पक्षाविरुध्द उमेदवार उभे करतात. अशी टिका त्यांनी केली.

विखे व थोरात यांच्यात कलगीतुरा सुरु असून जिल्हापरिषद निवडणूकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार विखे व त्यांचे चिरंजीव डॉ. सुजय यांनी निश्चीत केले. दोघेही सभा घेत आहेत. मात्र थोरात हे सक्रिय झालेले नाही. पक्षाला सर्व जागा लढविता आलेल्या नाहीत. काँग्रेस – राष्ट्रवादीची आघाडी ही जिल्’ाात झाली असली तरी अनेक ठिकाणी मत्रीपूर्ण लढती होत आहेत. काँगेसकडे पहिल्यांदाच उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या कमी होती. प्रथमच हे घडले आहे. पक्षाने ५६ जागांवर उमेदवार उभे केले आहे. पण एबी फॉर्म मिळूनही काही ठिकाणी उमेदवारी मागे घेण्याचे प्रकार घडले. जिल्ह्य़ात काँग्रेसची अवस्था दयनीय झाली असतांना विखे – थोरात यांचे भांडण अजुनही मिटलेले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थतता आहे.